आजची तिथी : विश्वावसु संवत्सर श्रीशके १९४७ आषाढ शु. द्वादशी.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : दो दिवाने शहर में, रात में और दोपहर में…आबोदाना ढूंढते है..!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) कुणी काहीही म्हणो, मनात अपार समाधान आहे. जे काम श्रद्धेय बाळासाहेबांनाही जमले नाही, ते मी चुटकीसरशी नव्हे, चुटकीही न वाजवता करुन दाखवले. खरे तर माझ्या या कार्याखातर माझा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार करायला काय हरकत आहे? हाच खरा महाराष्ट्रधर्म आहे ना? पण म्हणतात ना, ज्याचं करायला जावं भलं, तो म्हणे माझंच खरं.
बांदऱ्याचे ‘मातोश्री’वाले साहेब असोत किंवा दादरचे ‘शिवतीर्थ’वाले साहेब असोत, दोघेही माझे चांगले मित्र आहेत. (दोघांनीही मनोमिलनाचे श्रेय मलाच दिले. ‘थँक्यू’चा मेसेज पाठवून देणार आहे…) दोन्हीकडे जाऊन बटाटेवडे खाऊन आलेला मी दुसरा मनुष्य असेन.
पहिले आमचे गडकरीसाहेब! कारण ही आमची नागपुरी खासियत आहे. आपण काही दुश्मनी ठेवून जगत नाही. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो. सगळेच पर्मनंट मित्र असतात. याबाबत माझा आदर्श आमचे (नागपूरचेच) गडकरीसाहेब आहेत.
तेसुद्धा कुठेही जाऊन बटाटेवडे खाऊ शकतात. भेळ, पावभाजी, भजी, चिवडा…काहीही खाऊ शकतात. ज्याला खवय्येगिरीत इंटरेस्ट आहे, त्याला जागा कुठली आहे, याच्याशी फारसे देणेघेणे नसते. राजकारण एकीकडे, खवय्येगिरी दुसरीकडे!
बांद्रा-दादरवाल्या दोघाही साहेबांचे गेली वीस वर्षे फटाटले होते. अगदी एकमेकांचे तोंडही बघत नव्हते. एखाद्या समारंभात एकत्र येणारच असले तर समोरासमोर यायला टाळत असत. एकदा एका समारंभाला बांदऱ्याच्या साहेबांची गाडी सभागृहाबाहेरच उभी होती.
मी हटकले, तेव्हा काच किंचित खाली करुन म्हणाले, ‘तो आहे ना आत, तो गेला की मी येतो!’ ही अशी अवस्था होती. आत गेलो तर दुसऱ्या साहेबांनी कानात सांगितले, ‘तो गाडीत बसलाय ना? बसू दे दोन तास, मागल्या टायमाला मी असाच गाडीत चकरा मारत वेळ काढला होता…’
हे वितुष्ट बघून मला भारी वाईट वाटत असे. काहीही करुन या दोघांची दिलजमाई व्हायलाच हवी, असे मलाही मनापासून वाटत असे. शेवटी मीदेखील मराठी माणूसच आहे ना! प्रत्येक मराठी माणसाला ही दोन्ही भावंडे कधी एकत्र येतील, कधी त्यांना एकत्र पाहू, असे झाले होते. महाराष्ट्राची ती अपेक्षाही मी पूर्ण केली. मी दिलखुलास मनुष्य आहे. आपला कारभारच असा गतिमान आहे…
मी नेमकी काय जादू केली आणि हे दोघे भाऊ एकत्र आले? असा प्रश्न लोकांना पडला आहे. आधी कमी लोकांनी का प्रयत्न केले? भले भले थकले, शेवटी केस माझ्याकडे आली. मी आयडिया केली. दोघाही भावांना गुप्त भेट घेऊन अतिगुप्त टिप दिली.
त्यांना सांगितले की, महाराष्ट्राच्या दौलतीचा इडीमार्फत तपास होणार असून दौलतीचे वारसदार कोण कोण आहेत, त्याची माहिती जमा करण्याचे काम चालू आहे. तुम्हालाही क्लेम ठेवायचा असेल तर काहीही करा, पण एक फॅमिली ग्रुप फोटो काढून पुराव्यादाखल पाठवा. पुढचे मी बघून घेतो.
…मग काय! झाली की दिलजमाई! ग्रुपफोटोही झाला!! ‘दोघांची दिलजमाई, तिसऱ्याचा लाभ’ अशी नवी म्हण आजपासून तयार झाली आहे. मी पक्ष फोडणारा नसून पक्ष जोडणाराही आहे, हे यानिमित्ताने सिद्ध झाले. कुणी काही म्हणो, माझ्या मनात अपार समाधान आहे.