ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब', 14 देशांवर 40 % पर्यंतचा प्रचंड कर, भारतासंदर्भात काय निर्णय?
Tv9 Marathi July 08, 2025 03:45 PM

Trump On India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील १४ देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेले पत्र या देशांना पाठवले आहे. ट्रम्प टॅरिफचे पत्र प्रथम जपान आणि कोरियाला पाठवण्यात आले आहे. त्या देशांवर २५ टक्के टॅरिफ लावण्यात आला आहे. त्याच वेळी म्यानमार, लाओस, दक्षिण आफ्रिका, कझाकस्तान आणि मलेशिया येथून आयात केलेल्या उत्पादनांवर नवीन शुल्क जाहीर करण्यात आले आहे. सर्वाधिक टॅरिफ ४० टक्के म्यानमारवर लावण्यात आले आहे. १ ऑगस्टपासून हा टॅरिफ असणार आहे. दरम्यान, आतापर्यंत भारतावर कोणताही टॅरिफ जाहीर केलेला नाही. उलट ट्रम्प यांनी भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल म्हटले आहे की, आम्ही भारतासोबत करार करण्याच्या अगदी जवळ आहोत.

१४ देशांना पत्र पाठवले

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर या नवीन टॅरिफची माहिती दिली. त्यांनी म्हटले की, टॅरिफच्या निर्णयाशी संबंधित अधिकृत पत्रे सर्व देशांच्या नेत्यांना पाठवण्यात आली आहेत. ट्रम्प यांनी याला टॅरिफ पत्रांची एक नवीन लाट म्हटले. तसेच १४ देशांनी अमेरिकेवर टॅरिफ वाढवले तर त्यांच्यावर आणखी टॅरिफ लावण्यात येणार आहे. त्या देशांनी जितके टॅरिफ वाढवले, तितके अतिरिक्त टॅरिफ त्या देशांवर लावण्यात येणार आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १४ देशांवर नवीन शुल्क जाहीर करताना भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दलही वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, आम्ही भारतासोबत करार करण्याच्या जवळ आहोत. आम्ही ब्रिटन आणि चीनसोबत करार केला आहे. ट्रम्प यांच्या मते आम्ही ज्या देशांना टॅरिफ पत्रे पाठवली आहेत, त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे. परंतु त्या देशांसोबत आम्ही करार करू शकलो नाही. म्हणून त्यांना एक पत्र पाठवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात दिले होते संकेत

गेल्या आठवड्यात एअर फोर्स वनमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले होते की, त्यांनी डझनभर देशांसाठी टॅरिफ लेटरवर स्वाक्षरी केली आहे. तसेच त्या टॅरिफची घोषणा सोमवारी होणार आहे. आता नवीन टॅरिफ १ ऑगस्टपासून लागू होणार आहे.

कोणत्या देशांवर कित टॅरिफ
  • जपान 25%
  • दक्षिण कोरिया 25%
  • म्यानमार 40%
  • लाओस 40%
  • दक्षिण अफ्रिका 30%
  • कजाकिस्तान 25%
  • मलेशिया 25%
  • ट्यूनीशिया 25%
  • इंडोनेशिया 32%
  • बोस्निया 30%
  • बांगलादेश 35%
  • सर्बिया 35%
  • कंबोडिया 36%
  • थायलँड 36%
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.