- डॉ. मृदुल देशपांडे, MBBS, फंक्शनल मेडिसिन नूट्रिशनिस्ट
आज भारतात दर चौथा प्रौढ माणूस Pre-diabetes किंवा Insulin Resistance च्या टप्प्यावर आहे, आणि त्याला त्याचं कळलेलंही नसतं! आपल्याला मधुमेह होतो तेव्हा आपण उपचार सुरू करतो; पण फंक्शनल मेडिसिनचं तत्त्व वेगळं आहे – ‘मुळापासून प्रतिबंध’.
मधुमेह म्हणजे काय?
आपल्या शरीरातलं इन्सुलिन हे हार्मोन ग्लुकोज (साखर) पेशींमध्ये नेऊन ऊर्जा मिळवण्याचं काम करतं; पण जेव्हा शरीर सतत जास्त प्रमाणात साखरेच्या संपर्कात राहतं (अति धान्य खाणं, प्रोसेस्ड फूड्स), तेव्हा पेशी इन्सुलिनकडे दुर्लक्ष करतात. याला ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ म्हणतात. याच अवस्थेला फंक्शनल मेडिसिनमध्ये ‘मेटाबोलिक डीसफंक्शन’ म्हणतात.
‘ब्लड शुगर नॉर्मल’ असूनही धोका असतो?
होय! बऱ्याच वेळा फास्टिंग शुगर किंवा HbA1c नॉर्मल असतो; पण इन्सुलिन लेव्हल आधीपासूनच जास्त असते, जे केवळ ॲडव्हान्स्ड चाचण्यांतून कळते (जसं की फास्टिंग इन्सुलिन, HOMA-IR). ही स्टेज म्हणजे ‘शांत मधुमेह’, अजून रक्तात साखर वाढलेली नाही; पण शरीर आतून झगडतंय. इन्फ्लमेशन वाढलंय.
इन्सुलिन रेसिस्टन्सची लक्षणं
जेवल्यावर झोप यायला लागणं
पोटाच्या आजूबाजूला चरबी साठणं
रात्री भूक लागणं किंवा गोड खाण्याची तीव्र इच्छा (क्रेविंग्ज)
थकवा, मेंदू धूसर वाटणं (brain fog)
पीसीओएस / हार्मोनल असंतुलन (महिलांमध्ये)
फंक्शनल मेडिसिन दृष्टिकोन
फंक्शनल मेडिसिनमध्ये मधुमेह म्हणजे केवळ साखरेचा आजार नव्हे, तर दाह (Inflammation), हार्मोनल असंतुलन आणि मेटाबॉलिक कोलमडलेली यंत्रणा. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे फक्त मधुमेह नाही, तर बीपी, हार्ट प्रॉब्लेम्स, पीसीओएस, फॅटी लिव्हर, थायरॉईड समस्याही होऊ शकतात. इन्सुलिन रेझिस्टन्स हा सगळ्या दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांचं मूळ आहे.
मग काय कराल?
वेळेवर आणि शांतपणे जेवण
सतत खात राहणं टाळा. खाण्यात अंतर ठेवा (इंटरमिटंट फास्टिंगचा आधार)
तीन वेळेस योग्य जेवण. (कार्बोदके कमी)
अँटिइन्फ्लेमेटरी आहार
गहू, पांढरी साखर, मैदा, प्रोसेस्ड तेलं (सीड ऑईल) बंद करणे.
भरपूर भाज्या, लो-कार्ब फळं, ओमेगा ३ – जसे की जवस, मासे किंवा सप्लिमेंट्स घेणे
हलका व्यायाम = मोठा फरक
दररोज 30 मिनिटं चालणं, strength training, योग
योग्य झोप व स्ट्रेस मॅनेजमेंट
झोप कमी असली तर इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी घटते
मेडिटेशन, श्वसन.
चाचण्या वेळेवर करा
फक्त HbA1c नव्हे, तर फास्टिंग इन्सुलिन, HOMA-IR तपासायला हवंच
व्हिटॅमिन D, B12, लिव्हर फंक्शन टेस्ट - हे मेटाबॉलिक आरोग्यासाठी महत्त्वाचे घटक
मधुमेह ‘काळजी घेतली असती तर टाळता आला असता’ अशा आजारांपैकी एक आहे, आणि ती काळजी म्हणजे, सतत साखरेवर लक्ष ठेवणं नव्हे, तर इन्सुलिनच्या संवादावर लक्ष ठेवणं! मधुमेह या आजाराची आनुवंशिकता ही फक्त पाच टक्के असेल (Genes load the gun, lifestyle pulls the trigger), बाकी सगळं तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून आहे. फंक्शनल मेडिसिन तुम्हाला आजारी पडायच्या आधीच थांबवायची संधी देते. प्रश्न एवढाच – आपण ती संधी घेणार आहोत का?