प्रश्न - मला एक महान कलाकार किंवा संगीतकार व्हायचे आहे, असा मी विचार करतो; पण मला एक कारकुनी नोकरी मिळाली आहे आणि मी त्यात अडकलो आहे. अशा जीवन परिस्थितींना आपण कसे सामोरे जावे?
सद्गुरू - आपण आत्ता सध्या आपल्या जीवनात जिथे आहोत, ते अपघाताने नाही. जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी, आपण स्वतःला त्या परिस्थितीत आणले आहे. काही लोकांनी जाणीवपूर्वक स्वतःला जीवनाच्या अशा परिस्थितीत आणले आहे, काही लोक अजाणतेपणी त्यात आले आहेत; पण कोणत्याही प्रकारे, ती तुमचीच निर्मिती आहे.
आता तुम्हाला तुमचे जीवन पुन्हा निर्माण करायचे आहे. सध्या तुम्ही एका विशिष्ट परिस्थितीत आहात. पण तुम्हाला दुसरीकडे कुठेतरी जायचे असेल, तर तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
सर्वप्रथम, तुम्हाला कुठे जायचे आहे हे तुम्हाला स्पष्ट आहे का? जर ते स्पष्ट असेल, तर त्या दिशेने वाटचाल करणे सोपे ठरते. जेव्हा ती गोष्ट तुम्हाला स्पष्ट नसते, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाबाबत सर्व चुकीच्या गोष्टी करायला सुरुवात कराल.
तर आपण हे स्पष्ट करू या, की तुम्हाला खरंच काय हवे आहे? जर तुम्ही अगदी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे पाहिले, सर्व काही बाजूला ठेवून, जर तुम्ही इथे फक्त एक माणूस म्हणून बसून विचार केला, की तुम्हाला काय हवे आहे, तर तुम्हाला फक्त एकच गोष्ट हवी आहे, तुम्हाला आनंदाने जगायचे आहे; तेवढेच तुम्हाला हवे आहे.
जर एवढेच तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही त्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा तुम्ही या गोष्टीकडे लक्ष केंद्रित कराल, तेव्हाच ते घडून येईल. ते घडून येण्यासाठी आपण आपल्या क्षमतेनुसार जगात वेगवेगळ्या गोष्टी करतो. तुम्हाला एक महान संगीतकार व्हायचे आहे, पण तुमच्याकडे आवश्यक पूर्वअटी नाहीत म्हणून ते घडणार नाही.
तुम्हाला महान संगीतकार का व्हायचे आहे? कारण तुम्हाला वाटते, गाण्याने तुम्ही आनंदी व्हाल. पण जर तुम्ही आधीच खूप आनंदी असाल, तर तुम्ही आनंदाने गाल. तुमचा आवाज असा असो की तसा, दहा हजार लोक तुमचे ऐकत आहेत की दहा हजार लोक तुमच्यापासून दूर पळून जात आहेत, जर तुम्ही आनंदाने गात असाल, तर त्यामुळे तुम्हाला काय फरक पडतो?
कावळा आणि कोकिळा दोघेही आनंदाने गातात. कदाचित तुम्हाला वाटते, की कावळा भयानक आहे; पण त्याला त्याची पर्वा नाही. तो आनंदाने त्याचे गाणे गात आहे. म्हणून सर्वप्रथम, जर तुम्हाला हे समजले, की तुमची इच्छा नेमकी काय आहे आणि तुम्ही ते शोधले, तर ते पूर्ण करणे ही काही समस्या राहत नाही.