महाराष्ट्रात भाषिक वादाचा विषय चिघळत चालला आहे. प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर मारीरोड-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचं आव्हान दिलं. “राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, उचलून, उचलून आपटू” अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली.
“तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशात आहेत, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत?” असा सवाल त्यांनी केला.
तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस
“जर तुमच्यात हिंम्मत असेल, तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात आणि त्यांच्याच विचारांवर ते चालतात” असंही दुबे म्हणाले.
‘मनसेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न’
निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. “मनसेने मोर्चा काढला हा त्यांचा वयैक्तीक भाग आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठी भाषेवर राजकारण केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा हा अहवाल स्वीकारला गेला. त्याच अहवालात नमूद होतं की, हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच टि्वट झालं होतं. पण अचानक मनसेने मराठीचा मुद्दा काढल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीला यू टर्न दिला. आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत. अशा पद्धतीची भूमिका घेतली. मनसेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला” असं मंत्री उदय सामंत म्हणाले.
मनसेच म्हणणं आहे की, गुजराती भाषेला आंदोलनाची परवानगी दिली जाते. मात्र मराठीला परवानगी देत नाही. “मी यावर पूर्ण उत्तर दिलं आहे. लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर प्रशासनाकडून परवानगी दिली जाते” असं उदय सामंत म्हणाले.
निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय?
“निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलं, त्याच्याशी कोणी सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रात मराठी माणूस म्हणून राहतो. मला मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे. हीच एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठल्याही पक्षाचे जरी असले, तरी या वक्तव्याच समर्थन करता येणार नाही. असाच खुलासा भाजप नेते आशिष शेलार यांनी सभागृहात केला आहे” असं उदय सामंत म्हणाले.