IND vs ENG : तिसऱ्या कसोटी सामन्यातील निर्णयाचा WTC 2027 गुणतालिकेवर काय परिणाम होईल? भारत जिंकला तर..
GH News July 08, 2025 06:08 PM

अँडरसन तेंडुलकर मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने जबरदस्त कमबॅक केलं. एजबेस्टनमधील दुसरा कसोटी सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. आता तिसरा कसोटी सामना क्रिकेटची पंढरी म्हणून ख्याती असलेल्या लॉर्ड्सवर होणार आहे. हा सामना 10 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागून आहे. हा सामना जिंकल्यानंतर दोन्ही संघापैकी एकाला आघाडी मिळणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा विजयासाठी प्रयत्न असेल. पण या मैदानात खेळताना भारताचा आजवरचा इतिहास काय आहे हे देखील पाहणं आवश्यक आहे. आतापर्यंत भारताने लॉर्ड्सवर 19 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त तीन सामन्यात विजय मिळवला आहे. भारताने पहिला सामना 1986 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा सामना 2014 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. तिसरा सामना 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 151 धावांनी जिंकला होता. दुसरीकडे, इंग्लंडने या मैदानात एकूण 145 सामने खेळले आहेत. त्यापैकी 59 सामन्यात विजय मिळवला आहे.

दरम्यान, या सामन्याच्या निकालाचा परिणाम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर होणार आहे. भारताने दुसरा कसोटी सामना जिंकत 50 टक्के विजयी टक्केवारीसह तिसरं स्थान गाठलं आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. तिसरा कसोटी सामना भारताने जिंकला तर काय होईल? गमावला तर किती टक्केवारी घसरेल? तसेच ड्रॉ झाला तर काय फायदा होईल ते सर्व जाणून घेऊयात. दरम्यान या सामन्यात स्लो ओव्हर रेटचं गणित देखील पाळणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण त्याचा थेट परिणाम विजयी टक्केवारीवर होतो.

भारताने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना जिंकला तर टक्केवारीत वाढ होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर असेल. भारताची विजयी टक्केवारी ही 66.67 इतकी होईल. तर इंग्लंडच्या टक्केवारीत घट होत 33.33 पर्यंत जाईल. दुसरीकडे, हा सामना इंग्लंडने जिंकला तर मात्र स्थिती या उलट असेल. इंग्लंडची विजयी टक्केवारी 66.67 आणि भारताची विजयी टक्केवारी 33.33 टक्के होईल. पण हा सामना ड्रॉ झाला तर भारत आणि इंग्लंडच्या विजयी टक्केवारीत 5.56 टक्क्यांची घसरण होईल. दोन्ही संघांची विजयी टक्केवारी ही 44.44 टक्के होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.