मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकल ट्रेनमधील गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुंबईच्या उपनगरीय लोकल ट्रेनमधील गर्दी कमी व्हावी यासाठी मध्य रेल्वेने शहरातील ८०० हून अधिक सरकारी आणि खासगी कार्यालयांना पत्र पाठवले आहे. या पत्रात मध्य रेल्वेकडून त्यांच्या कार्यालयीन वेळेत टप्प्याटप्प्याने बदल करण्याची विनंती केली आहे. सकाळी आणि संध्याकाळी होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि लोकल प्रवासाचा अनुभव अधिक सुखकर व्हावा, यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे.
तब्बल ३५ लाखांपेक्षा अधिक प्रवाशांचा लोकल प्रवासमुंबई लोकल हे केवळ वाहतुकीचे साधन नसून, कोट्यवधी मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. दररोज मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. यातून तब्बल ३५ लाखांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करतात. ही सेवा स्वस्त आणि वेगवान असल्याने दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत चालली आहे. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, घाटकोपर, ठाणे यांसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात सरकारी आणि खासगी कार्यालय आहेत. यातील बहुतांश कार्यालयांच्या वेळा सकाळी १० ते संध्याकाळी ७ पर्यंत असतात.
सध्या या कार्यालयांमध्ये वेळेच्या नियोजनाचा अभाव आहे. बहुतेक कार्यालये एकाच वेळी सुरू होऊन एकाच वेळी सुटत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी सर्वच उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याच गर्दीच्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे.
मध्य रेल्वेच्या पत्रात काय?मध्य रेल्वेने अनेक कार्यालयांना पत्र दिले आहे. या पत्रात स्पष्ट केले आहे की, कार्यालयीन वेळांमध्ये टप्प्याटप्प्याने बदल केल्यास गर्दीचे विभाजन होईल. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मध्य रेल्वेने केंद्र आणि राज्य सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, विविध महामंडळे, बँका, महापालिका, महाविद्यालये यांसारख्या सर्व संस्थांना यावर गांभीर्याने विचार करावी, अशी विनंती केली आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन, मध्य रेल्वेने राज्य सरकारलाही या विषयात हस्तक्षेप करण्याची आणि कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. राज्य सरकारच्या हस्तक्षेपाने हा बदल अधिक प्रभावीपणे लागू होऊ शकतो, अशी रेल्वेला आशा आहे.
मध्य रेल्वेच्या या आवाहनाला मुंबईतील विविध कार्यालये कसा प्रतिसाद देतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हा बदल प्रत्यक्षात आला, तर मुंबईच्या लोकलमधील गर्दी कमी होण्यास नक्कीच मदत होईल. तसेच प्रवाशांनाही काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.