नवऱ्याशी भांडल्यावर तिने रागात घर सोडलं, मदतीच्या बहाण्याने बदमाशांनी ट्रेनमध्ये नेलं आणि…
Tv9 Marathi July 08, 2025 04:45 PM

पतीवर रागावून घर सोडलेल्या महिलेसोबत अतिशय भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. त्या महिलेवर ट्रेनमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला रेल्वे ट्रॅकवर फेकून दिलं आण ते पळून गेले. यादरम्यान, महिलेला ट्रेनने धडक दिली आणि ती गंभीर जखमी झाली. तिला पाय गमवावा लागला. यानंतर, लोको पायलटने जीआरपीला घटनेची माहिती दिली. जखमी महिलेला उपचारासाठी रोहतक पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. हरियाणातील पानिपतमधील या दुर्दैवी घटनेनंतर महिलेच्या पतीने न्यायाची याचना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे 24 जून रोजी पतीशी काही कारणावरून भांडण झाल्यानंतर, ती पानिपत येथील घरातून तिच्या माहेरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र आपली पत्नी बेपत्ता झाली आहे अशी तक्रार पतीने 25 जून रोजी पोलिसांत दाखल केली. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार, काही लोकांनी तिला घरी परत सोडण्याचे आश्वासन देऊन फसवले आणि रेल्वे स्टेशनवरील एका ट्रेनच्या रिकाम्या डब्यात नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. चार जणांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला, असा आरोप महिलेने केला आहे.

ट्रेनच्या डब्यात सामूहिक अत्याचार

यावेळी महिलेने आरोपींकडे खूप विनंती केली, त्यांच्या हातापाया पडली आणि पळून जाण्याचा प्रयत्नही केला, परंतु ट्रेनमध्ये महिलेवर क्रूर अत्याचार करण्यात आलं. सगळ्यात भयानक गोष्ट म्हणजे आरोपींनी सामूहिक अत्याचारानंतर त्या महिलेला रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले. त्यानंतर महिलेची समोरून येणाऱ्या ट्रेनशी टक्कर झाली, ज्यामुळे तिचा पाय कापला गेला. यानंतर लोको पायलटने जीआरपीला याची माहिती दिली. जीआरपी घटनास्थळी पोहोचले आणि जखमी महिलेला प्रथम पानीपत आणि नंतर रोहतक पीजीआयमध्ये दाखल केले.

मला न्याय द्या – महिलेची मागणी

रोहतक पीजीआयमध्ये महिलेवर उपचार सुरू आहेत. आता पीडित महिला ही प्रशासनाकडे न्यायाची याचना करत आहे. पीडितेने रडत म्हटले की तिला न्याय हवा आहे. घर सोडल्याने असे होईल याची तिला पुसटशी कल्पना नव्हती. यापूर्वी देखील तिचं पतीशी अनेकदा भांडण झाले होते, पण असे कधीच घडले नाही आणि ती कधीही घराबाहेर पडली नाही. पतीशी भांडण झाल्यानंतर ती पहिल्यांदाच घराबाहेर पडली होती, असं महिलेने सांगितलं.

मदतीच्या नावाने हैवानांची क्रूरता

ती बाहेर पडल्यानंतर त्यानंतर काही लोकांनी तिला मदत करण्याचे आश्वासन दिले आणि घरी सोडण्यासाठी त्यांच्या गाडीत बसवले. नंतर ते तिला रेल्वे स्टेशनवर घेऊन गेले आणि एका रिकाम्या डब्यात नेऊन त्यांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या सांगण्यानुसार, ट्रेनचे पुढचे आणि मागचे सर्व डबे प्रवाशांनी भरलेले होते, परंतु एक डबा रिकामा होता, ज्यामध्ये तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.