Nashik Citylink Bus : नाशिक सिटीलिंक बससेवेला ४ वर्षे पूर्ण; ८ कोटींहून अधिक प्रवासी, २४३ कोटींचा महसूल
esakal July 08, 2025 09:45 PM

नाशिक- महापालिकेच्या वतीने शहरात चालविल्या जाणाऱ्या सिटीलिंक बससेवेचे चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात बस धावण्याचा लेखाजोखा सिटीलिंक कंपनीच्या वतीने मांडण्यात आला आहे. त्यात चार वर्षात ५.७८ कोटी किलोमीटर बस धावल्या तर ८ कोटी ९ लाख प्रवाशांना सेवा दिली आहे.

आठ जुलै २०२१ पासून सिटीलिंक बससेवा सुरु झाली. गेल्या चार वर्षात दोनशे सीएनजी तर ५० डिझेल बस चालविल्या जातात. तपोवन डेपो येथून एकूण २९ मार्गांवर १५० तर नाशिक रोड डेपोतून २८ मार्गांवर १०० बस चालविल्या जातात. सिटीलिंक कंपनीने एकूण ५७ मार्ग निश्चित केले असून त्यावर अडीचशे बस धावत आहे.

पहिल्या वर्षी १०४ बसच्या माध्यमातून २१ हजार ६२३ किलोमीटर दररोज याप्रमाणे ७५ लाख ७३ हजार ५०७ किलोमीटर बस धावल्या. तर ८५ लाख ५६ हजार ७५१ प्रवाशांनी प्रवास केला. दुसऱ्यावर्षी २०९ बसच्या माध्यमातून ४४ हजार ९७२ किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे १.६४ कोटी १४ हजार ८४८ किलोमीटर बस धावल्या. २ कोटी ३७ लाख १० हजार ५६२ प्रवाशांनी प्रवास केला. तिसऱ्या वर्षापासून अडीचशे बसच्या माध्यमातून ४५ हजार ५८९ किलोमीटर प्रतिदिन १ कोटी ६६ लाख ३९ हजार ९६५ किलोमीटर बस धावल्या. २ कोटी ४६ लाख ९८ हजार २८८ प्रवाशांनी प्रवास केला.

Pune Railway : हडपसर, खडकीवरून सुटणार नव्या रेल्वे; टर्मिनलवर यार्ड व मार्ग जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात

चौथ्या वर्षी ४६ हजार ९३० किलोमीटर दररोज १ कोटी ७२ लाख ७० हजार १६ किलोमीटर बसचा प्रवास झाला. २ कोटी ४० लाख ३३ हजार ९१२ प्रवाशांनी प्रवास केला. चार वर्षात २४३ कोटी, ५७ लाख ९७ हजार ५३९ रुपये महसुल मिळाला. पहिल्या वर्षी २२ कोटी ६० लाख ६३ हजार ६३४ रुपये, दुसऱ्या वर्षी ७२ कोटी १६ लाख ६२ हजार ६४९ रुपये, तिसऱ्या वर्षी ७४ कोटी ५१ लाख ९१ हजार १५ रुपये तर चौथ्या वर्षी ७४ कोटी २८ लाख ८० हजार २४१ रुपये मिळाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.