कुत्रा भूंकला, अंगावर धावून आला… घाबरलेला मुलगा जीव वाचवण्यासाठी इमारतीत चढला अन्… 12 वर्षाच्या मुलासोबत काय घडलं?
Tv9 Marathi July 08, 2025 10:45 PM

नागपूरमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. भटक कुत्रा भूंकला आणि अंगावर धावून आल्याने जीव वाचवण्यासाठी एक 12 वर्षाचा मुलगा धावतपळत इमारतीत शिरला. पण इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तोल गेल्याने या मुलाचा मृत्यू झाला आहे. नागपूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पवनगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. जयेश बोकडे असं या 12 वर्षाच्या मुलाचं नाव आहे. रविवारी दुपारी 4 वाजता ही घटना घडली. जयेश मित्रांसोबत खेळून घरी जात होता. त्यावेळी रस्त्यावरचा एक कुत्रा जयेशला पाहून भूंकू लागला. त्यामुळे जयेश घाबरला आणि त्याने तिथून पळ काढला. त्यामुळे कुत्राही त्याच्या मागे मागे धावला. त्यामुळे जयेश आणखीनच घाबरला आणि जीवाच्या आकांताने त्याने धूम ठोकली. जीव वाचवण्यासाठी जयेश सैरावैरा धावत होता. काय करावे हे त्याला कळत नव्हते. तर कुत्राही काही मागे हटायला तयार नव्हता.

इमारतीतही कुत्रा शिरला

कुत्र्यापासून लपण्यासाठी जयेश जवळच असलेल्या देव हाईट्स या इमारतीत शिरला. त्यामुळे कुत्राही त्याच्या पाठोपाठ इमारतीत शिरला. त्यामुळे जयेश अधिकच घाबरला. तो सहाव्या मजल्यावर गेला आणि सहाव्या माळ्यावरील कॉमन खिडकीजवळ लपून बसला. पण हा कुत्रा तिथेही जयेशचा पाठलाग करत आला. जयेश जिथे लपला होता, तिथे कुत्रा आला आणि त्याने जयेशच्या दिशेने झडप मारली. त्यामुळे घाबरलेल्या जयेशचा तोल गेला आणि तो सहाव्या माळ्यावरील कॉमन खिडकीतून खाली कोसळला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

जयेशला पाहताच झडप घातली

जयेश खाली कोसळताच लोकांची एकच गर्दी झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. या पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे जयेशच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. भटके कुत्रे रस्त्यावर फिरतातच कसे? महापालिकेचं श्वान पथक या कुत्र्यांना पकडत का नाही? असा संताप स्थानिकांमधून व्यक्त केला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.