अपने गली में कुत्ता भी शेर होता है, हमें महाराष्ट्र और मराठी भाषा…; मराठी हिंदी वादात अबू आझमींची एण्ट्री
Tv9 Marathi July 08, 2025 10:45 PM

भिवंडीत, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आसिम आजमी यांनी मराठी भाषेबाबत सुरू असलेला वाद आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांतील राजकीय समीकरणांवर भाष्य केले. अबू आसिम आजमी यांनी स्पष्टपणे सांगितले की, मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे. हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि संस्कृतीशी निगडित विषय आहे. परंतु त्याचबरोबर त्यांनी असेही सुचवले की, ज्यांना मराठी येत नाही त्यांना मारणे फार चुकीचे आहे.

काय म्हणाले अबू आझमी

अबू आजमी म्हणाले की, ‘हे अगदी बरोबर आहे. अपने गली में कुत्ता भी शेर होता है ही म्हण अगदी बरोबर आहे. पण जर तुम्ही कोणाला मारले तर असे शब्द तोंडातून निघणारच. तुम्ही अशा प्रकारे कोणाला मारु शकत नाही. महाराष्ट्राने उत्तर भारतीय असू देत किंवा देशातील कोणत्याही कोपऱ्यातून लोक उपाशी, विना तिकिट येतात आल्यावर कठोर परिश्रम करतात, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात आणि मोठी माणसे होतात, त्यांचे पोट भरते, अरबपती बनतात.’

वाचा: रहस्यमय! किर्रर रात्री मृत तृतीयपंथीयाला चालवत स्मशानभूमीपर्यंत नेतात, तुम्हाला हे माहीत आहे का?

‘आम्ही मराठीचा आदर करतो’

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्राने खूप काही दिले आहे. आम्ही महाराष्ट्राचा आदर करतो. पण ज्या प्रकारे मराठीच्या नावाखाली परप्रांतियांना मारले जात आहे मग ते राजस्थानमधून आलेले असू देत किंवा इतर कुठून त्यांच्या विरोधात सरकारने कारवाई केली पाहिजे. महाराष्ट्राचा सन्मान, मराठीचा सन्मान आम्ही सगळे करतो. जे लोक मराठी अस्मितेविषयी बोलतात, मराठी उत्तर भारतीयांची भांडणे लावतात, मराठी-हिंदीचा वाद मुद्दाम काढतात तेच लोक मराठी माणसांसोबत चुकीचे वागतात. हे लोक केवळ आणि केवळ मते मिळवण्यासाठी राजकारण करत आहेत. मराठीचे नाव घेऊन मत मिळवण्याची त्यांची राजिनिती समोर आली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.