मोठा ट्विस्ट! मनसेच्या मोर्चाला शिंदेच्या मंत्र्याची साथ, थेट मोर्चात सहभागी होणार, शिंदे गटात चाललंय काय?
Tv9 Marathi July 08, 2025 10:45 PM

महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादामुळे मीरा-भाईंदर शहर आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिवसांपूर्वी एका गुजराती व्यापाऱ्याला मारहाण झाल्याच्या प्रकरणानंतर काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून आज मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. यामुळे सध्या मीरा भाईंदरमधील मराठी लोक हे रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सध्या मीरा भाईंदरमध्ये मोठा जमाव रस्त्यावर एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व लोकांची पोलिसांकडून धरपकड केली जात आहे. आता या मोर्चाबद्दलची मोठी अपडेट समोर आली आहे. मीरा भाईंदरमधील या मोर्चात सरकारधील एक मंत्री सहभागी होणार आहे.

मीरा भाईंदर प्रकरणी नुकतंच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली. आता मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे, जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी प्रताप सरनाईकांना अटक करुन दाखवावी, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले.

पोलिसांमध्ये हिंमत असेल तर…

“मराठी भाषिकांनी जर शांतता मार्गाने मोर्चासाठी परवानगी मागितली होती तर ती त्यांना द्यायला हवी होती. जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून सुरु केलेली आहे, ही दादागिरी त्या भागाचा आमदार म्हणून प्रताप सरनाईक कधीही सहन करणार नाही. आज सकाळपासून मीरा भाईंदरच्या पोलिसांनी ज्या काही मराठी लोकांची धरपकड सुरु केली आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो. मुख्यमंत्र्यांकडेही निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी निघालो आहे, जर पोलिसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी प्रताप सरनाईकांना अटक करुन दाखवावी”, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

ही तर आणीबाणी – अरविंद सावंत

यावर खासदार अरविंद सावंत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.  “मीरा भाईंदरमधील मोर्चा हा कुठल्या पक्षाचा नसून मराठी अजेंडासाठीचा मोर्चा होता. मात्र सत्ताधारी पक्षाने मराठी माणसाच उच्चाटन करायचा डाव मांडला. तीन, साडेतीन वाजता कार्यकर्त्यांना अटक करता ही तर आणीबाणी आहे”, अशी थेट टीका खासदार अरविंद सावंत यांनी सरकारवर केली आहे.

“भाजपने संविधान हत्या दिन साजरा केला. मात्र भाजप रोज संविधानाची हत्या करते. राज्यात नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या नाही हे संविधानाची हत्या की संविधानाचा सन्मान यांचं उत्तर द्यावं. ही लोक लोकशाहीच्या मुळावर येणारी आहेत. पहलगाम विसरायचा हा त्यांचा मूळ अजेंडा आहे. मिडिया रोज या बातम्या दाखवत राहिल्यामुळे एक नेरेटीव्ह सेट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राने आधी हिंदीला विरोध केला नाही. हिंदी बोलतो म्हणून कधी मारलं नाही. सुशांत सिंहने आत्महत्या केली. बिहारच्या निवडणुकीत भाजपने त्याचा फोटो लावून प्रचार केला. तुम्ही नही भुलेंगे, काय संबंध होता? आता देखील बिहार निवडणुकीसाठी ही सगळं सुरू आहे”, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.