Leader of Opposition, Legislative Assembly : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चावरून वाद पेटला आहे. मोर्चेकरी आणि पोलिासांमध्ये झटापटी आणि शाब्दिक चकमक दिसून येत आहे. मोठ्या संख्येने या भागात कार्यकर्ते, पदाधिकारी जमा होत आहेत. मराठी-अमराठी वाद वाढत असतानाच इकडे विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन छेडले आहे. उद्धव सेनेने थेट सरन्यायाधीश भूषण गवई यांनाच साकडे घातले आहे. काय आहे अपडेट?
मीरा भाईंदरमध्ये वातावरण तापले
मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला होता. तर त्याविरोधात आज मनसेच्या मोर्चाचे नियोजन होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. मनसे नेत्यांची सकाळीच धरपकड केली. त्यानंतर ही मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा निघणार असा इशारा मनसेने दिला होता. तर या मोर्चात मराठी माणसाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळपासून या परिसरात मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पोलिसात बाचाबाची दिसली. तर त्यातील अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दिवसभर वातावरण चिघळणार असल्याचे चिन्ह आहेत.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
आज सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सत्कार सोहळा सरकार दरबारी आयोजीत करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाने विधान भवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलनाची हाक दिली. महाविकास आघाडीतील सर्व विरोधी पक्षनेते विधान भवनाच्या पायऱ्यांवरच आंदोलन करताना दिसून आले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव सेनेने पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन लक्षवेधी ठरले.
सरन्यायाधीशांना घातले साकडे
विधानसभेत सरकार विरोधी पक्षांवर अन्याय करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन छेडले आहे. खालच्या सभागृहात विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद अजून ही देण्यात आलेले नाही. त्यामुळे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे याविरोधात तक्रारीचा असा सूर विरोधकांनी आवळण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव देण्यात आले आहे. पण अद्यापही सरकारने त्याविषयीची घोषणा केलेली नाही. आज सरन्यायाधीश यांचा सत्कार सोहळा होणार आहे. त्यांच्यासमोर कैफियत मांडण्यासाठी उद्धव सेनेसह सर्व विरोधी पक्षांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. यावेळी न्याय द्या. न्याय द्या. चीफ जस्टीस न्याय द्या, असे साकडे त्यांना घालताना आमदार आदित्य ठाकरे दिसून आले.