PM मोदींना मिळणार ब्राझीलचा 'ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस' सर्वोच्च पुरस्कार
Tv9 Marathi July 09, 2025 03:45 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान प्रथम घानाला गेले. त्यानंतर त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोला आणि अर्जेंटिनाला भेट दिली. पंतप्रधान मोदी आता या दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात चार दिवसांसाठी ब्राझीलमध्ये मुक्काम करणार आहेत. पंतप्रधान सध्या ब्राझिलियाला पोहोचले आहेत. आता ब्राझीलने ‘ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस’ हा सर्वोच्च पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्राझीलची राजधानी ब्राझीलियामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी अल्व्होराडा पॅलेसमध्ये ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांनी गळाभेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींना 114 घोड्यांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. यावेळी भारत आणि ब्राझीलचे राष्ट्रगीत देखील वाजवण्यात आले. याआधी ब्राझीलिया विमानतळावर ‘बटाल्हा मुंडो’ बँडच्या पथकाने पंतप्रधानांचे स्वागत केले होते.

Vislumbres da cerimônia de boas-vindas em Brasília. Esta visita de Estado ao Brasil dará um novo impulso às nossas relações bilaterais.@LulaOficial pic.twitter.com/KcErMeHonx

— Narendra Modi (@narendramodi)

महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता

पंतप्रधान मोदी आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्यात द्विपक्षीय बैठका होणार आहे. या बैठकीत महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे. याबाबत ब्राझीलमधील भारतीय राजदूत दिनेश भाटिया यांनी आधीच संकेत दिले आहेत.

दहशतवादाविरुद्ध रणनीती, गोपनीय माहितीची देवाणघेवाण, अक्षय ऊर्जा आणि कृषी संशोधनात सहकार्य याबाबत करार होण्याची शक्यता आहे. हे करार दोन्ही देशांमधील संबंध आणखी मजबूत करतील. हे दोन्ही नेते व्यापार, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, तंत्रज्ञान, आरोग्य आणि शेती यासारख्या क्षेत्रात एकमेकांना मदत करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती समोर आली आहे.

ब्राझीलनंतर नामिबियाचा दौरा करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझिलनंतर नामिबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्यातील हा शेवटचा देश असणार आहे. नामिबियाच्या दौऱ्यातही काही धोरणात्मक करार होणार आहेत, ज्याचा फायदा दोन्ही देशांना होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.