घरात लावलेल्या दोरखंडाशी खेळत असताना चुकून गळफास लागून एका १२ वर्षांचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना जळगावात घडली आहे. जळगाव शहरातील विद्यानगर येथे राहणाऱ्या प्रदीपकुमार अहिरे यांचा मुलगा हार्दीक याला तो नऊ महिन्यांचा असताना पुण्यातील एका संस्थेकडून दत्तक घेण्यात आले होते. त्याचा अशाप्रकारे मृत्यू ओढवल्याने पालकांनी टाहो फोडला आहे.
हार्दिक दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर शेजारच्या घरी खेळायला गेला होता. त्या ठिकाणी बांधलेल्या दोरखंडाशी खेळत असताना अचानक दोरखंडाचा गळफास लागला आणि चिमुकल्या हार्दिक गुदमरुन बेशुद्ध झाला. त्यास एका महिलेने पाहिले आणि आरडाओरडा केला. परंतू तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले आहे. या घटनेने अहिरे कुटुंबावर शोककळा पसरली असून रामानंदनगर पोलीसठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हार्दिक हा नऊ महिन्याचा असताना त्याला अहिरे कुटुंबाने पुण्याच्या एका संस्थेतून दत्तक घेतले होते. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे पालकांनी एकच आक्रोश केला. प्रदीपकुमार अहिरे हे विद्यानगरात पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतात. रावेर तालुक्यातील केऱ्हाळे येथील एका माध्यमिक शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१५ मध्ये प्रदीपकुमार आणि त्यांच्या पत्नीने पुणे येथील एका संस्थेतून हार्दिकला ९ महिन्याचा असतांना हार्दीकला दत्तक घेतले होते. हार्दिक त्यांच्या जीवनातील आनंदाचा स्रोत बनला होता.परंतू हा आनंद आज अशा प्रकारे हिरावला गेला आहे.
त्यावेळी घरात कोणीही नव्हते..सोमवारी दुपारी ३ वाजता हार्दिक शाळेतून घरी आला. चहा-बिस्किटे खाल्ल्यानंतर त्याची आई लहान भाऊ प्रसादला ट्यूशनला सोडण्यासाठी बाहेर गेली होती. यावेळी हार्दिक एकटाच शेजारच्या घरी खेळायला गेला. दुर्दैवाने, तिथे खेळत असताना छताला लावलेल्या दोरीशी खेळताना तिचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. काही वेळाने, घरात राहणाऱ्या एका महिलेच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तात्काळ आरडाओरड केली. त्याला तातडीने खाजगी वाहनाने जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती हार्दिकला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.