येमेनमध्ये एका भारतीय परिचारिकेला अर्थात नर्सला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे. भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला येत्या 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी होणार आहे. 37 वर्षीय निमिषा ही केरळची रहिवासी आहे. सध्या ही नर्स तुरुंगात आहे. मात्र निमिषाला कोणत्या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तिचा गुन्हा नेमका काय असे प्रश्न सध्या सगळ्यांच्या मनात घोळत आहेत.
निमिषा हिला एका येमेनी नागरिकाच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आला आहे. त्याच प्रकरणात ती सध्या तुरुंगात आहे. या मृत्यूप्रकरणी निमिषा हिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तिला पुढील आठवड्यात फाशी दिली जाईल. मात्र दुसूरकडे, तिची फाशी थांबवण्यासाठी निमिषाचं कुटुंब सतत मदतीची याचना करत आहे.
का दिली जाणार फाशी ?
मिळालेल्या माहितीनुसार, निमिषा प्रिया ही 2008 साली मध्ये मध्य पूर्वेतील येमेन या देशात गेली. तिथे तिने अनेक रुग्णालयात काम केले. त्यानंतर तिने स्वतःचे क्लिनिक उघडले. क्लिनिक उघडत असताना निमिषा 2014 मध्ये तलाल अब्दो महदीच्या संपर्कात आली. व्यवसाय सुरू करण्यासाठी निमिषाने महदीशी संपर्क साधणे महत्त्वाचे होते, कारण येमेनमधील नियमांनुसार, व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक व्यक्तीसोबत भागीदारी करणे बंधनकारक आहे.
मात्र महदीच्या संपर्कात आल्यानंतर केरळच्या या नर्सचे, निमिषाचे महदीशी भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की निमिषाने महदीविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर 2016 मध्ये महदीला अटक करण्यात आली, परंतु नंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. सुटकेनंतरही, महदीने निमिशाला धमकावणे सुरूच ठेवले होते असे वृत्त आहे.
महदीचा मृत्यू कसा झाला ?
निमिषाच्या कुटुंबीयांनी असा दावा केला आहे की महदीने तिचा पासपोर्ट जप्त केला होता. त्यानंतर निमिषाने तिचा जप्त केलेला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी महदीला भूल देण्याचे इंजेक्शन दिले होते. तथापि, ओव्हरडोसमुळे त्याचा मृत्यू झाला. महदीच्या मृत्यूनंतर, निमिषाने येमेनमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु पळून जाण्याचा प्रयत्नात असतानाच तिला अटक करण्यात आली.
कोण आहे निमिषा प्रिया ?
निमिषा प्रिया ही एक भारतीय परिचारिका/नर्स आहे. ती मूळची केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आहे. ती 2008 साली कामाच्या शोधात येमेनला गेली होती. निमिषाची आई कोचीमध्ये घरकाम करते, आर्थिक अडचणींमुळे निमिषा ही फभारत सोडून येमेनला काम करण्यासाठी गेली. येमेनला पोहोचल्यानंतर आणि अनेक रुग्णालयांमध्ये काम केल्यानंतर, निमिषाने स्वतःचा क्लिनिक उघडण्याचा विचार केला. क्लिनिक उघडण्यासाठी, ती महदीच्या संपर्कात आली आणि तिथूनच एकेक गोष्टी बिघडू लागल्या असे समजते.
मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली निमिषा प्रिया ही सध्या देशाची राजधानी साना येथील तुरुंगात आहे, जी हुथींच्या नियंत्रणाखाली आहे. यानंतर, 2018 साली, या प्रकरणात महदीच्या हत्येसाठी निमिशाला दोषी ठरवण्यात आले. एका येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी तिला ट्रायल कोर्टाने दोषी ठरवले, हा निर्णय नोव्हेंबर 2023 मध्ये देशाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने कायम ठेवला.
येमेनी कायद्यात विविध गुन्ह्यांसाठी मृत्युदंडाची तरतूद आहे, यामध्ये “देशाच्या स्वातंत्र्याचे, एकतेचे किंवा प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन करणे”, “सशस्त्र दलांना कमकुवत करण्यासाठी काही काम करणे”, खून, अंमली पदार्थांची तस्करी, समलैंगिकता, धर्मत्याग किंवा इस्लामला नकार देणे आणि वेश्याव्यवसायाला प्रोत्साहन देणे यांचा समावेश आहे.
राष्ट्रपतींकडून फाशीला मंजूरी
गेल्या वर्षी येमेनच्या राष्ट्रपतींनी केरळच्या निमिषा प्रियाच्या फाशीच्या शिक्षेला मान्यता दिली. परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांच्या सांगण्यानुसार, गेल्या वर्षापासून ते या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी आणि नर्सच्या कुटुंबातील सदस्यांशी सतत संपर्कात आहोत आणि सर्व शक्य मदत पुरवली जात आहे, असेही त्यांनी नमूद केलं.
केस लढण्यासाठी आईने घर विकले
निमिषा प्रियाची आई ही कोचीमध्ये घरकाम करते, तिने हाँ खटला लढण्यासाठी तिचे घर विकले, असे निमिषासाठी न्याय मागणाऱ्या राजकारणी, व्यापारी, कार्यकर्ते आणि स्थलांतरितांच्या व्यासपीठाचा भाग असलेले वकील सुभाष चंद्रन म्हणाले.
आम्ही या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करत आहेत आणि कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहेत, अस जानेवारीमध्ये, केंद्राने सांगितले. पण आता “वेळ संपत आहे” असा इशारा देत निमिषाच्या आईने मदतीची विनंती केली. “भारत आणि केरळ सरकार तसेच तिला वाचवण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने आतापर्यंत दिलेल्या सर्व मदतीबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे. पण, हे माझे शेवटचे आवाहन आहे – कृपया तिचे प्राण वाचवण्यास आम्हाला मदत करा. वेळ संपत चालली आहे.” असे निमिषाची आई म्हणाली.