IND vs ENG : तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने काढलं अस्त्र, भारतीय फलंदाजांचं टेन्शन वाढलं
GH News July 09, 2025 08:07 PM

भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना आघाडी घेण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. वर्कलोड मॅनेजमेंटनंतर लॉर्ड्सवर कसोटी सामन्यासाठी जसप्रीत बुमराह उतरणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पायाखालची वाळू आधीच सरकली आहे. असं असताना इंग्लंडनेही या सामन्यासाठी अस्त्र बाहेर काढलं आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांना धावा करण्यात अडचणी येणार आहेत. लॉर्ड्स कसोटी मालिकेसाठी टीम इंग्लंडने प्लेइंग 11 जाहीर केली आहे. यात वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरची एन्ट्री झाली आहे. चार वर्षानंतर त्याची कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. जोफ्रा आर्चरला जोश टंगच्या जागी संघात सहभागी केलं आहे. आर्चर मागच्या काही वर्षांपासून कोपरा आणि पाठदुखीच्या त्रासाला सामोरं गेला आहे. मात्र आता पूर्णपणे बरा झाला असून मैदानात परतण्यास उत्सुक आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये जोफ्रा आर्चर शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

जोफ्रा आर्चर कौटुंबिक कारणास्तव दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळला नव्हता. मात्र तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने एका निवेदनात स्पष्ट केलं की, ‘ससेक्सचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर नॉटिंगमहॅमशायरच्या जोश टंगची जागा घेईल. फेब्रुवारी 2021 नंतर आर्चर पहिला कसोटी सामना खेळेल. त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी सामना खेळला होता.’ जोफ्रा आर्चर 2019 ते 2021 दरम्यान इंग्लंडसाठी 13 कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने 31.04 च्या सरासरीने 42 विकेट घेतल्या आहेत. 2019 च्या एशेज मालिकेत 20.27 च्या सरासरीने 20 विकेट काढल्या होत्या.

भारताविरुद्ध पहिल्या दोन कसोटी सामन्यात इंग्लंडची गोलंदाजी फेल गेली होती. आर्चर आणि मार्क वूडची उणीव भासली होती. पण आता आर्चरची एन्ट्री झाल्याने संघाचं बळ वाढलं आहे. त्यामुळे आता भारतीय फलंदाजांचं टेन्शन वाढणार आहे. भारतीय फलंदाजांना पहिल्या दोन कसोटी सामन्यांसारखी कामगिरी करायची असेल तर जोफ्रा आर्चरचा पेपर सोडवावा लागणार आहे. जर यात टीम इंडियाचे फलंदाज पास झाले तर विजय निश्चित आहे.

तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग 11 : जॅक क्राउली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.