कुठल्याही महिलेसाठी मातृत्व एक मोठी गोष्ट असते. स्त्री आई बनल्यानंतर आपली जबाबदारी वाढली अशी तिची भावना असते. आपल्या बाळासाठी आई काहीही करायला तयार असते. आपल्या वाट्याला जे भोग आले, ते बाळाच्या वाट्याला नको अशी कुठल्याही आईची इच्छा असते. पण एक महिला याला अपवाद ठरली आहे. एका महिला तिच्या प्रियकरासाठी 11 महिन्याच्या बाळाला सोडून गेली. कुठल्याही बाळाला जन्मापासून आईची सोबत कळते. आई आपल्या आसपास नाही, हे त्या बाळाला जाणवलं. रडून रडून त्या बाळाची हालत इतकी खराब झाली की, 11 महिन्याच्या त्या निष्पाप जीवाचा मृत्यू झाला.
लाचार पित्याने पत्नीच्या कृत्याबद्दल पोलिसांना सांगितलं. क्वार्सी पोलीस ठाणे क्षेत्रातील हे प्रकरण आहे. पत्नीला शोधून काढावं म्हणून पती पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करत राहिला. पण 11 महिन्याचा तो चिमुकला जीव हे जग सोडून गेला. उत्तर प्रदेशच्या अलीगढमधील हे प्रकरण आहे.
तर बाळ आज जिवंत असतं
आईसोबत नसल्यामुळे बाळाच आजारपण वाढत गेलं. मंगळवारी बाळाचा मृत्यू झाल्यानंतर वडिल कोसळून गेले. पती स्वत:ला संभाळू शकत नव्हता. आई असती, तर बाळ आज जिवंत असतं, असं पतीने सांगितलं. जलालपूर गावातील एक युवक ई-रिक्क्षा चालक आहे. मागच्या पाच वर्षांपासून तो रावणटीला येथील भाड्याच्या घरात कुटुंबासोबत राहत होता.
कसं सुरु झालं प्रेम प्रकरण?
आरोपानुसार, महिन्याभरापूर्वी त्या घरात दुसरा भाडेकरु रहायला आला. या नवीन भाडेकरुची दुसऱ्या भाडेकरुच्या पत्नीसोबत जवळीक वाढली. 27 जून रोजी पत्नी घरातून पाच हजार रुपये घेऊन फरार झाली. घरात 11 महिन्याच्या बाळाला टाकून ती प्रियकरासोबत पळून गेली. संध्याकाळी पती घरी आला, तेव्हा त्याने पाहिलं की, बाळ रडत आहे. नातेवाईकांनी बराच शोध घेतला, पण दोघांबद्दल काही माहिती मिळाली नाही.
आरोपी प्रियकर सुद्धा दोन मुलांचा पिता
आरोपी प्रियकर सुद्धा दोन मुलांचा पिता आहे. आई निघून गेल्यानंतर 11 महिन्याच्या मुलाची दिवसेंदिवस तब्येत बिघडत गेली. मंगळवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृतदेहाच दफन केल्यानंतर तो एसएसपी कार्यालयात पोहोचला. तिथून त्याला पोलीस ठाण्यात पाठवण्यात आलं. आता पोलीस प्रेमी युगुलाचा शोध घेत आहेत.