उद्धव सेनेने कूस बदलताच, काँग्रेसमध्ये अस्वस्थता, महाविकास आघाडीत फूट पडणार का? काय आहे वार्ता?
Tv9 Marathi July 09, 2025 10:45 PM
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आले. महाविकास आघाडी अस्तित्वात आली. पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. महायुतीचे सरकार आले. तर 5 जुलै रोजी मुंबईत राजकारणाने पुन्हा कूस बदलली. 18 वर्षांनी दोन ठाकरे बंधू एकत्र आले. मराठी विजयी मेळावा निमित्ताने राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच्या या घडामोडींमुळे राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता आहे. काँग्रेस या मनोमिलन कार्यक्रमापासून दूर उभी ठाकली. तर राष्ट्रवादी साक्षीदार झाली. महाविकास आघाडीत काय घडामोडी?
उद्धव ठाकरेंचा नवीन मार्ग नाही मानवणार
उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही वर्षात कट्टर हिंदुत्वाकडून सॉफ्ट हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू केली आहे. सर्वसामावेशक हिंदू अशी पक्षाची प्रतिमा तयार होत आहे. उद्धव सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत महाविकास आघाडीत आहे. 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या बॅनरखाली लढले. राज ठाकरे त्यावेळी भाजपच्या बाजूने होते. मराठी अस्मितेसाठी दोन्ही ठाकरे आता एकत्र आले आहेत. ठाकरेंचा हा नवीन मार्ग काँग्रेसला मानवणार नाही, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते.
काँग्रेसपुढील अडचण
- काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. उद्धव ठाकरे यांच्या नवीन भूमिकेचे अथवा दोन्ही ठाकरे बंधूच्या भूमिकेला त्यांनी समर्थन दिले तर राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेल्या छबीवर परिणाम दिसू शकतो. मुंबई आणि महाराष्ट्रातील हिंदी भाषिक लोक काँग्रेसचे मतदार आहेत. काँग्रेसचे परंपरागत मतदार भाजपाकडे जाण्याची भूमिका पण पक्षासमोर आहे.
- मनसेची हिंदी आणि मुस्लीमविरोधी छबी उद्धव ठाकरे यांच्यासाठी कमी आणि काँग्रेससाठी जास्त नुकसानदायक ठरू शकते. महानगरपालिका निवडणुकीपूरते मराठी मतदारांना उद्धव-राज युती आकर्षित करेल. पण दीर्घकाळासाठी काँग्रेसला हा सौदा तोट्याचा ठरू शकतो. त्यांचा परंपरागत मतदार दूर जाऊ शकतो.
- विजयी मेळाव्यात त्यामुळेच काँग्रेस नेत्यांनी दांडी मारल्याचा दावा करण्यात येतो. मुंबई आणि ठाण्यात बिगर मराठी विशेषता हिंदी भाषिक उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. काँग्रेसचे हे मतदार मानण्यात येतात. राज ठाकरे यांची हिंदी-मुस्लीमविरोधी आवाज या मतदारांना नाराज करू शकतो. त्याचा परिणाम महाविकास आघाडीत काँग्रेसला पण बसू शकतो.
- मनसेने उद्धव सेनेप्रमाणे काही मतांना आणि विचारांना मुरड घातल्यास अथवा त्यात नरमाई आणल्यास कदाचित काँग्रेसला अडचण येणार नाही. कारण आज मुस्लिमांच्या मनात भाजपाविषयी नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक मतांची एकजूट केल्यास महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो. त्यावेळीमहाविकास आघाडीला फुटण्याची भीती नसेल आणि त्यांच्याकडे राज ठाकरे यांच्या रूपाने एक मुलूख मैदान तोफ पण असेल.