आझाद मैदानात मागच्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी आंदोलन स्थळाला शरद पवार यांनी भेट दिली. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनीही आझाद मैदानात येऊन आंदोलक शिक्षकांशी संवाद साधला. त्यांना पाठिंबा देताना मार्गदर्शन केलं. “त्यांना मुंबई हवी, का तर त्यांना माहीत आहे. त्यांच्या लेखी मुंबईला मुंबादेवीच्या नावावरून मुंबई म्हणतो. पण हे दोन व्यापारी तिकडे बसले आहेत. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काही मोकळं झालं. म्हणूनच मराठी माणसात आग लावायची, मराठी अमराठी भेद करून भेदाभेद करून आपल्यात फूट पाडण्याचा डाव आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“एकदा का हा डाव साधला की यांना चरायला कुरण मोकळं झालं. एका बाजूला आपण एक लढा लढत आहोत, धारावीचा लढा. आपल्यावर जे आरोप करतात शिवसेनेने मुंबईतील मराठी माणूस बाहेर काढला. अरे आहे ना मुंबईतच आहे. आम्ही तुम्हाला राजकारणात इथेच गाडणार आहोत. इथेच ठेचणार आहोत. या राज्यकर्त्यांना सांगतो. मराठी माणूस एकवटला आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तुम्हाला वचन द्यायला आलोय’
“आपला आवाज कोणीही बंद करू शकणार नाही. त्यांना वाटत असेल त्यांनी आपला करंट काढला. पण आता आपण सगळ्यंनी मिळून भाजपला असा करंट दिला पाहिजे की सत्तेच्या खुर्चीतून ते उडून पडले पाहिजेत. मी तुम्हाला वचन द्यायला आलोय. जी गोष्ट मी तुम्हाला, आपलं सरकार असताना हो म्हटलं होतं. तुम्ही एकजुटीने सोबत राहिला तर तुमच्या हक्काचं जे आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांना मुंबई लुटायची माहीत आहे
“गिरणी कामगारांना शिवसेनेचा पाठिंबा मागण्याची गरज नाही. शिवसेना तुमचीच आहे. शिवसेना तुमच्यासोबत आहे. आणि सोबतच राहणार आहे. गिरणी कामगार त्यांचा इतिहास, गिरण्यांचा इतिहास हे उरावर बसलेल्या सत्ताधाऱ्यांना माहीत नाही. त्यांना मुंबई लुटायची माहीत आहे. मुंबईसाठी रक्त सांडण्याचं माहीत नाही” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
तेव्हाच्या केंद्र सरकारला गुडघ्यावर आणलं
“गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात रक्त सांडलं नसतं तर राज्यकर्त्यांना सांगतो तुमच्या बुडाखालची खुर्ची दिसली नसती. त्यावेळीही मुंबईवर अधिकार सांगितला जात होता. पण मराठी माणूस, गिरणी कामगार तर आघाडीवर होता. सर्व रस्त्यावर उतरले. तेव्हाच्या केंद्र सरकारला गुडघ्यावर आणलं आणि आपली मुंबई आपण राखली. त्याच मुंबईत दिल्लीतील मालकाचे नोकर मुंबईकरांना बाहेर काढायला असूसलेला आहे” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.