“विकासाच्या नावाखाली धारावीकरांना अपात्र करून बाहेर काढत आहेत. तुम्ही विचार करा, आजपर्यंत धारावीकडे कुणाचं लक्ष नव्हतं. तुम्ही अडगळीत पडला, तसे धारावीकर होते. आता धारावी अदानीच्या घशात घातली. 1600 एकर मुंबईची जागा अदानीच्या घशात टाकली. मिठागरं, देवनार डंपिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घातलं” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. आझाद मैदानात शिक्षकांच्या आंदोलनस्थळी उद्धव ठाकरे बोलत होते. “आज गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे. पूर्वीच्या काळात संप झाला. जे काही ठरलं होतं. ते गिरणी कामगारांना दिलं नाही. कामगारांच्या उरावर टॉवर उभे केले. सोन्यासारखी जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली. ज्यांनी मुंबई मिळवून दिली. त्यांना शेलू आणि वांगणीला पाठवलं. आमची ठाम मागणी आहे. गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागी जागा द्या. आणि अदानीचे टॉवर शेलू आणि वांगणीला बांधू द्या. देवनार डंपिंगवर अदानीला टॉवर बांधू द्या” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“गिरणी कामगार, पोलीस आणि सफाई कामगारांना हक्काची जागा द्या. ज्यांच्यावर मुंबई आहे त्यांना हक्काची जागा द्या. आपलं सरकार आलं नाही. नाही तर तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज पडली नसती. काही वेळेला डोळ्यावर पट्टी बांधली जाते” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
तर आम्ही नतद्रष्टा सारखे भांडत बसू?
“आम्ही दोन्ही भाऊ आलो ना एकत्र. कशासाठी आलो. आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही. प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू. माझे आजोबा आणि बाळासाहेब तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. आणि आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टा सारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं
“आता उभे राहिलो. जो जो मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. त्यामुळे धीर सोडू नका. हिंमत हरू नका. शेलू आणि वांगणीला अदानीला पाठवायचं आणि धारावीत आपला गिरणी कामगार आलाच पाहिजे, ही मागणी घेऊन यायचं” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. एकजुटीची वज्रमूठ अशीच ठेवा. तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ. हे वचन देतो” असं उद्धव ठाकरे म्हणाले.