मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत पक्षातील नेत्यांना, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा आदेश दिला आहे. राज ठाकरेंनी असा आदेश का दिला याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता राजकीय विश्लेषकांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
काय म्हणाले विजय चोरमारे?
राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी म्हटले की, ‘राज ठाकरे यांनी सावध पवित्र घेतला आहे. त्यांची संघटना ही शिस्त बद्ध नाही कोणी काही बोलू नये वेगळा मेसेज जाऊ नये यासाठी त्यांनी हे केल असावं. आता राज ठाकरे यांना मागे येत येणार नाही, तसं झालं तर राज ठाकरे यांना मोठा फटका बसेल.’
शिवसेना मनसे युतीवर भाष्य करताना विजय चोरमारे यांनी सांगितले की, दोघे भाऊ एकत्र आले म्हणजे लगेच युती झाली असं नाही. त्याला एक प्रक्रिया आहे, उद्धव ठाकरे यांनी जेवढा उत्साह दाखवला तेवढा राज ठाकरे यांचा नव्हता. जर कदाचित आम्ही एकत्र येणार आहोत हे राज ठाकरे बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या भाषनाला अर्थ राहिला नसता. राज ठाकरे यांनी पण उद्धव ठाकरे यांचं मोठेपण जपलं. जर कदाचित दोघे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांचं महत्व कमी होईल.
संजय आवटे यांचं विश्लेषण
राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले की, ‘ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांची देहबोली आणि आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलू नये अशी राज ठाकरेंची पोस्ट येणे म्हणजे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय?’
पुढे बोलताना आवटे म्हणाले की, ‘ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणून ते पुढेही एकत्र येतील असं कोणी समजू नये. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आलेत त्याचा सर्वात जास्त फटका एकनाथ शिंदे आणि त्यानंतर भाजपाला बसणार, भाजपाला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपली सत्ता आणायची आहे. युती झाली तर महाविकास आघाडीला राज ठाकरे चालतील, मात्र राज ठाकरे यांना महाविकास विकास आघाडी चालेल का?’
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या ट्विटवर भाष्य केलं आहे. ‘धोरणात्मक निर्णय पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचे असतात, जे काही त्यांनी म्हटलं आहे, ते मनसेच्या अध्यक्ष आहेत ते त्यांच्या तो अधिकार आहे.’ असं शिंदे म्हणाले.