लॉर्ड्सला क्रिकेटची पंढरी म्हंटलं जातं. त्यामुळे या मैदानात विजय मिळवणं हे प्रत्येक कर्णधाराचं स्वप्न असतं. लीड्स कसोटी सामना गमावल्यानंतर एजबेस्टनमध्ये भारताने कमबॅक केलं. पण तिसरा कसोटी सामना वाटतो तितका सोपा नसेल. आतापर्यंत भारताचे 15 कर्णधार आपल्या संघासह लॉर्ड्स मैदानात उतरले आहेत. यात 12 जणांच्या पदरी निराशा, तर तीन कर्णधारांना यश मिळालं आहे. शुबमन गिलहा लॉर्ड्सवर कसोटी सामना खेळणारा 16वा कर्णधार आहे. त्यामुळे त्याच्यापुढे मोठं चॅलेंज आहे. शुबमन गिल लॉर्ड्सवर विजय मिळवणाऱ्या तीन कर्णधारांच्या यादीत समाविष्ट होईल का? सर्वात आधी लॉर्ड्सवर टीम इंडियाची कामगिरी कशी आहे? याबाबत अभ्यास करणं आवश्यक आहे. भारतीय 1932 पासून लॉर्ड्सवर कसोटी क्रिकेट खेळत आहे. आतापर्यंत या मैदानात 19 सामने खेळले असून तीनमध्ये विजय मिळवला आहे. तर 12 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर चार सामने ड्रॉ झाले आहेत.
टीम इंडियाने लॉर्ड्सवर तीन कसोटी सामने जिंकले आहेत. यात कपिल देव, एमएस धोनी आणि विराट कोहली कर्णधार होते. कपिल देवच्या नेतृत्वात 1986 मध्ये भारताने पहिल्यांदा कसोटी जिंकली होती. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 28 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधींतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2014 मध्ये जिंकला. त्यानंतर सात वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने लॉर्ड्सवर विजयी पतका रोवली होती. आता शुबमन गिलच्या नेतृत्वात अशी कामगिरी करणं शक्य आहे का? एकंदरीत आकडेवारी पाहीली तर आकडे भारताच्या विरूद्ध आहेत. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात एजबेस्टन कसोटीसारखा चमत्कार घडेल का? यासाठी टीम इंडियाकडे लक्ष लागून आहे.
भारताने आतापर्यंत खेळलेल्या 19 सामन्यापैकी 9 सामन्यात टॉस जिंकला आहे. तर 10 सामन्यात टॉस गमावला आहे. 9 कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी केली होती. यापैकी 2 सामने जिंकले, तर सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं. तर एक सामना ड्रॉ झाला. 10 कसोटी सामन्यात टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी केली. त्यात फक्त एक सामना जिंकला. तर सहा सामने गमावले आहेत. तर तीन सामने ड्रॉ करण्यात यश मिळालं आहे.