मीरा-भाईंदर - मीरा रोड येथे मंगळवारी (ता. ८) ‘मराठी’साठी निघणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारत पहाटेपासून कार्यकर्त्यांची धरपकड केली, तरीही मराठीप्रेमी आंदोलकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत भव्य मोर्चा काढला.
शेकडो कार्यकर्त्यांचा दहा वाजल्यापासून अखंड ओघ सुरू होता. पोलिसांनी नाकेबंदी केली, अनेकांना ताब्यात घेतले; तरीही ते मोर्चा रोखू शकले नाहीत. मराठीप्रेमींनी एकजुटीचे दर्शन घडविले. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला होता.
या मोर्चाला पाठिंबा देण्यास आलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधातही जमावाने जोरदार घोषणाबाजी केली. मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा असे काही घडले तर असेच मोर्चे निघतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मीरा रोडवरील व्यापाऱ्याला मनसेसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी परवानगी नसतानाही मोर्चा काढला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मराठी एकीकरण समितीने जाहीर केले होते.
त्याला उद्धव ठाकरे यांच्या पक्षासह, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्ष यांनीदेखील पाठिंबा दिला; मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली व सर्व महत्त्वाच्या नेत्यांना नोटिसा बजावल्या होत्या.
‘मनसे’चे अविनाश जाधव यांच्यासह मराठी एकीकरण समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मंगळवारी पहाटेच घरातून ताब्यात घेण्यात आले होते, त्यामुळे मोर्चा निघेल की नाही, यावर साशंकता व्यक्त केली जात होती; मात्र आंदोलकांनी हा समज खोटा ठरविला आहे.
राज्य सरकारवर दडपशाहीचा आरोप
मीरा-भाईंदरसह मुंबई व ठाण्यातूनही मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते मिळेल त्या मार्गाने आंदोलनस्थळी दाखल होत होते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची अक्षरश: धावपळ उडत होती. व्यापाऱ्यांच्या मोर्चात पोलिसांनी कोणाचीही धरपकड केली नाही; मग आम्हालाच अटक का करता, असा संतप्त सवाल करीत मराठी माणसाची ही गळचेपी असून सरकार दडपशाही करीत आहे, असा आरोप आंदोलक करीत होते. या सर्वांमुळे वातावरणात तणाव वाढू लागला. तरीदेखील पोलिसांनी संयम दाखवून कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला.
मोर्चाला विशाल स्वरूप
धरपकड करण्यात आलेले आंदोलक अचानक मोठ्या संख्येने चौकात जमा झाले असता त्यांना रोखण्यासाठी पोलिस धावले; परंतु आंदोलकांपुढे पोलिसही हतबल झाले होते. जोरदार घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी ठरविलेल्या मार्गावरून मोर्चा काढला. थोड्याच वेळात या मोर्चात शेकडोंच्या संख्येने आंदोलक दाखल होत गेले. त्यामुळे मोर्चा मीरा रोड रेल्वेस्थानकाजवळ पोहोचेपर्यंत त्याला विशाल स्वरूप आले होते. रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या शहीद स्मारकात जमून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
ज्येष्ठ नेत्यांचा मोर्चात सहभाग
शहीद चौकात आलेल्या मोर्चामध्ये मनसेचे नेते अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे, विनोद घोसाळकरदेखील सहभागी झाले. त्यामुळे आंदोलकांचा जोर आणखी वाढला. जोपर्यंत मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिस सोडत नाहीत, तोपर्यंत मोर्चा संपणार नाही, असे या वेळी घोषित करण्यात आले. पोलिसांनी जाधव यांच्यासह मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना सोडल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
सरनाईक यांना जोरदार विरोध
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी शहीद चौकात आले असता त्यांना जोरदार विरोध करण्यात आला. वातावरण बिघडत असलेले पाहून सरनाईक यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला. ‘आपल्याविरोधात घोषणाबाजी होईल, याची पोलिसांनी आधीच कल्पना दिली होती; मात्र मराठीसाठी व मोर्चेकऱ्यांना शब्द दिला होता त्यामुळे आपण त्या ठिकाणी गेलो. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मनसे व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोडविण्यासाठीदेखील आपण स्वत: पोलिस ठाण्यात गेलो होतो.’ असे सरनाईक यांनी सांगितले.