कर्नाक उड्डाणपुलाचे ऑपरेशन सिंदूर पूल असे नामांतर, या तारखेला फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
Tv9 Marathi July 09, 2025 09:45 AM

मध्य रेल्वेवरील धोकादायक ठरवून पाडलेल्या कर्नाक पुलाच्या जागी नवा पुल उभारल्यानंतरही त्याचे उद्घाटन रखडले होते. या प्रश्नावर नुकतेच आंदोलन देखील करण्यात आले होते. आता या पुलाचे नामकरण ‘ऑपरेशन सिंदूर पुल’ असे करण्यात येणार असून येत्या १० जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.

मध्य रेल्वेवरील मस्जिद बंदर जवळी हा कर्नाक पुल धोकादायक ठरवण्यात आला होता. त्यानंतर हा ब्रिज पाडण्यात आला. मात्र हा पुल उभारण्यास प्रदीर्घ कालावधी लागला. त्यानंतर हा पुल तयार होऊनही त्याचे उद्घाटन होत नसल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने शिवसेना आणि मनसेने येथे आंदोलन केले होते. आता कर्नाक ब्रिजचे नामकरण विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मागणीनुसार ऑपरेशन सिंदुरवरुन ऑपरेशन सिंदुर पुल असे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुलाचे उद्घाटन आता येत्या गुरुवारी १० तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.

स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

मध्य रेल्वेच्या कर्नाक बंदर येथील मस्जिद स्थानकाच्या जवळ असलेला हा पुल गेली अनेक वर्षे बांधकामामुळे बंद असल्याने स्थानिकांना मोठा वळसा घालून जावे लागत आहे. या पुलाला मध्य रेल्वेच्या इंजिनिअर आणि आयआयटी तज्ज्ञांनी धोकादायक ठरल्यानंतर पाडण्यात आले होते. त्यानंतर हा पुल बांधण्यासाठी देखील प्रदीर्घकाळ लागला. या भागातील रहिवाशाचे पुर्नवर्सन तसेच पुलाचे डिझाईन अशा अनेक अडचणीनंतर हा पुल एकदाचा तयार झाला आहे. आता या पुलाचे उद्घाटन एकदाचे मार्गी लागणार असल्याने स्थानिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.