महाराष्ट्र राज्यात ‘सीईटी सेल’च्या माध्यमातून अभियांत्रिकी प्रवेशासाठी पर्याय (ऑप्शन) फॉर्म भरताना अचूक आणि योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी ‘सीईटी सेल’ने प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
यंदा तीनऐवजी चार CAP (केंद्रिकृत प्रवेश प्रक्रिया) राउंड असतील, तसेच पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये कंपल्सरी ऑप्शन मिळाल्यास सीट कन्फर्म करणे बंधनकारक केले आहे.
प्रवेश प्रक्रियेतील मुख्य बदल २०२५
१. कॅप राउंड - आता चार फेऱ्या
पहिला राउंड - प्रथम क्रमांकावरील सीट मिळाल्यास ‘ऑटो फ्रिज’ होईल.
दुसरा राउंड - पहिल्या ते तिसऱ्या ऑप्शनपैकी मिळालेली कोणतीही सीट ‘ऑटो फ्रिज’ होईल.
तिसरा राउंड - पहिल्या ते सहाव्या ऑप्शनपैकी मिळालेली सीट ‘ऑटो फ्रिज’ होईल.
चौथा राउंड - ही अंतिम फेरी असते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाऊन थेट प्रवेश घ्यावा लागतो.
२. कंपल्सरी कन्फर्मेशन -
कॅप राउंड एक ते तीनमध्ये, अनुक्रमे पहिला, पहिले तीन व पहिले सहा ऑप्शन्सपैकी मिळाल्यास सीट स्वीकारणे अनिवार्य असेल. हे विद्यार्थी स्पॉट राउंडसाठी पात्र असतील. पहिल्या सहा पर्यायांव्यतिरिक्त पर्याय मिळाल्यास ‘बेटरमेंट’ (नॉट फ्रिज) करता येऊ शकते. कुठल्याही राउंडमध्ये मिळालेला पर्याय आवडल्यास ‘सेल्फ फ्रिज’ करून प्रवेश निश्चित करता येऊ शकतो.
महाविद्यालयाचे प्रकार आणि प्रवेश प्रक्रिया
१. स्वायत्त (ऑटोनॉमस) महाविद्यालय -
अभ्यासक्रम, मूल्यांकन पद्धती स्वतः ठरवतात, मात्र पदवी संलग्न विद्यापीठाद्वारे दिली जाते. राज्यस्तरावर गुणवत्तेद्वारे प्रवेश मिळतो.
२. अस्वायत्त महाविद्यालय -
विद्यापीठ ठरवलेल्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण व परीक्षा असते, पदवीही संलग्न विद्यापीठाद्वारे दिली जाते. या महाविद्यालयामध्ये ‘होम’ व ‘अदर दॅन होम’ विद्यापीठ असा कोटा असतो.
ऑल इंडिया (जेईई कोटा), होम, अदर दॅन होम, ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस या सर्वांचे पर्याय एकाच ऑप्शन फॉर्ममधून द्यावे लागतात.
ऑप्शन फॉर्म भरण्याच्या सूचना
१. प्राधान्यानुसार पर्याय भरा
महाविद्यालय व शाखांची यादी तयार करा. सर्वांत आवडता पर्याय प्रथम क्रमांकावर ठेवा. प्रत्येक वरचा ऑप्शन हा खालच्या ऑप्शनपेक्षा चांगला असला पाहिजे.
२. ३०० पर्याय भरता येतील
फक्त काही मोजकेच ऑप्शन भरल्यास सीट मिळण्याची शक्यता कमी असते. जास्तीत जास्त योग्य पर्याय उतरत्या क्रमात लावल्यास योग्य पर्याय मिळू शकतो.
३. तपशील अचूक भरा
महाविद्यालयाचे नाव, शाखेचे योग्य पर्याय, आपल्या पर्सेंटाइल पेक्षा किमान दोन ते पाच पर्सेंटाइल वरचे व खालचे पर्याय यादीमध्ये ठेवणे उपयोगी ठरू शकते. मागील वर्षीच्या ‘कट ऑफ’ चा अभ्यास उपयोगी ठरतो.
राउंड २, ३ आणि ४ मध्ये कोण सहभागी होऊ शकतो?
ज्यांना आधीच्या फेऱ्यांमध्ये कोणतीही सीट मिळाली नाही.
ज्यांनी पर्याय फॉर्म भरलेच नाहीत. किंवा ज्यांना कमी पसंतीची सीट मिळाली आणि त्यांनी ती फ्रीझ न करता ‘बेटरमेंट’ (नॉट फ्रिज) पर्याय निवडला.
स्पॉट राउंड - सर्व राउंडनंतर रिक्त राहिलेल्या जागांकरिता महाविद्यालय स्तरावर अर्ज मागवून स्पॉट राउंड घेतल्या जाईल. यामध्ये सर्व उमेदवारांना ओपन कॅटेगिरीप्रमाणे शुल्क आकारले जाईल.
महत्त्वाचे - ‘कट ऑफ’चा ट्रेंड, ब्रँच प्रेफरन्स, महाविद्यालयाचा शैक्षणिक व प्लेसमेंट ट्रॅक, घरापासूनचे अंतर/होस्टेल, कॉलेजची फीस यांचा अभ्यास ऑप्शन तयार करताना उपयोगी होतो.