आपण घरात असल्यावर ग्लासाने पाणी पितो. पण, पाणी पिण्यासाठी ऑफिस किंवा बाहेर जाताना आवर्जून पाण्याची बाटली सोबत ठेवावी लागते. सतत लागणारी तहान शमवण्यासाठी सोबत पाण्याची बाटली असलेली केव्हाही चांगली असते. यातही बहुतांश जण प्लास्टीकच्या बाटल्यांचा वापर करताना दिसतात. बाजारात सध्या विविध प्रकारच्या बाटल्या उपलब्ध आहेत. आपण आवडीने त्या खरेदी करतो. त्या विविध आकारातही मिळतात. पण पाण्यासाठी वापरत असलेली ही बाटली स्वच्छ करताना अनेकदा आपण घाईत नुसती विसळतो आणि पुन्हा त्यात पाणी भरतो, ज्यामुळे बाटलीतील बॅक्टेरिया तसेच राहताता आणि पाण्यावाटे आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. यासाठी पाण्याची बाटली व्यवस्थितपणे धुण्याचा सल्ला तज्ज्ञमंडळी देतात. आज आपण जाणून घेऊयात पाण्याची बाटली किती दिवसांनी स्वच्छ करायला हवी.
किती दिवसांनी धुवावी?
- पाण्याची बाटली रोज वापरत असाल तर ती दररोज स्वच्छ करणे आवश्यक आहे.
- उन्हाळ्यात किंवा दमट हवामानात बॅक्टेरिया लवकर वाढतात. त्यामुळे अशा वातावरणात दर एक ते दोन दिवसांनी बाटली स्वच्छ करायला हवी.
- जर तुम्हाला तोंड लावून पाणी पिण्याची सवय आहे, म्हणजेच तुम्ही बाटली थेट तोंडाला लावत असाल तर ती प्रत्येक दिवशी स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे आहे.
- स्टील आणि काचेच्या बाटल्या दोन ते तीन दिवसांनी धुवायला हव्यात. तुम्ही या बाटल्या गरम पाण्याने धुवाल तर उत्तमच राहील.
- जर बाटलीतून वास येत असेल तर ती लगेचच स्वच्छ करावी.
- एकदंरच, प्रत्येक वापरानंतर बाटली धुतल्याने बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता कमी होते आणि आरोग्य सुरक्षित राहते.
बाटली कशी स्वच्छ करावी?
- पाण्याची बाटली बाहेरुन स्वच्छ करणे सोपे असते. पण, आतून स्वच्छ करणे सहजपणे शक्य होत नाही. अशावेळी तुम्ही बाटली आतून स्वच्छ करण्यासठी ब्रशचा वापर करायला हवा.
- बाटली धुतल्यानंतर उलटी करून ती पूर्णपणे कोरडी करणे आवश्यक आहे.
- याशिवाय पाण्याची बाटली स्वच्छ करण्यासाठी डिश सोपचा वापर करू शकता. यासाठी एका पॅनमध्ये किंवा भांड्यात पाणी घेऊन ते कोमट करून घ्यावे. यात 1 ते 2 चमचे लिक्विड सोप घाला. तयार पाणी रात्रभर पाण्याच्या बाटलीत भरून ठेवा. सकाळी बाटली स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
हेही पाहा –