अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील पालेगाव भागातील पटेल झिऑन या गृह संकुलात एका 12 वर्षांच्या मुलाला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे. लिफ्टने घरी निघालेल्या या मुलाने लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून इमारतीमधील एका रहिवाशाने त्याला बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 4 जुलैला सायंकाळी घडल्याची माहिती मिळत आहे. पीडित मुलगा हा याच इमारतीच्या 14 व्या मजल्यावर राहतो. या दिवशी तो ट्युशनहुन लिफ्टने आपल्या घरी जात होता. यावेळी 9 व्या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि लिफ्टचे दरवाजे उघडले. मात्र लिफ्ट उघडल्यानंतर त्याला कोणीही समोर दिसला नाही म्हणून त्याने लिफ्टचा दरवाजा बंद केला. मात्र 9 व्या मजल्यावर राहणारा कैलाश थवानी हा लिफ्टमध्ये आला आणि लिफ्टचा दरवाजा बंद केल्याच्या रागातून त्या मुलाला मारहाण केली. दरम्यान, प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.