भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये बांग्लादेश दौरा करणार होता. पण आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि परिस्थिती लक्षात घेत बीसीसीआयने हा दौरा रद्द केला. या दौऱ्यात भारतीय संघ वनडे आणि टी20 मालिका खेळणार होती. पण हा दौरा रद्द करत बांग्लादेश दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या चाहत्यांना धक्का बसला होता. कारण हे दोघेही फक्त वनडे खेळताना दिसणार आहे. अशा स्थितीत हा दौरा रद्द होणं चाहत्यांसाठी वाईट बातमी होती. पण बीसीसीआयने यासाठी एक प्लान आखल्याचं आता समोर येत आहे. टीम इंडिया पुढील महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार असल्याचे वृत्त आहे. या दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी20 मालिका असेल. याबाबत अद्याप काही स्पष्ट नाही. पण श्रीलंकेतील घडामोडी पाहता हे शक्य होईल असं दिसत आहे.
बांग्लादेश दौरा रद्द झाल्याने भारतीय संघाचे ऑगस्ट वेळापत्रक रिकामे झाले आहे. यासाठी बीसीसीआयने व्हाईट बॉल मालिका आयोजित करण्याची योजना आखली आहे. योगायोगाने जुलै-ऑगस्टमध्ये होणारी श्रीलंका प्रीमियर लीग पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे, श्रीलंकेचेही ऑगस्टचे वेळापत्रक देखील रिकामे झाले आहे. त्यामुळे एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी चर्चा सुरू असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे भारत श्रीलंकेचा दौरा करण्याची शक्यता आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माकडे कर्णधारपद असण्याची शक्यता आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील शेवटचा सामना जुलै 2024 मध्ये झाला होता. भारताचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा हा पहिला दौरा होता. या दौऱ्यात भारताने टी20 मालिका जिंकली होती. पण श्रीलंकेने एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव केला होता. जर आता गणित जुळलं तर भारत श्रीलंका मालिका ऑगस्टच्या मध्यात होऊ शकते. कारण 29 ऑगस्टपासून श्रीलंकन संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे.