छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत काही ठिकाणी भेसळ आढळून आली. यात गेल्या सहा महिन्यांत विभागातर्फे १९ प्रकरणांमध्ये एक लाख रुपये दंड ठोठावण्यात आला, तर ४५ प्रकरणे न्यायालयात निर्णयासाठी दाखल केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त द.वि. पाटील यांनी दिली.
जानेवारी ते जूनदरम्यान विभागातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत दूध व दुग्धजन्य पदार्थांचे ४६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. ११ नमुने असुरक्षित असल्याचे आढळून आले. पनीरचे १८ नमुने घेण्यात आले. त्यात २ नमुने असुरक्षित होते.
ईट राइट इंडिया चॅलेंजअंतर्गत शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये यांच्या कॅन्टीन सुविधांचे निर्जंतूकता गुणांकन करण्यात आले, तर उन्हाळ्यात शीतपेये, उसाचा व फळांचा रसविक्रेते, खाद्य बर्फ विक्रेते, बाटलीबंद पाणी विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात आल्या. १९ नमुने तपासण्यात आले, त्यात १ नमुना असुरक्षित असल्याचे दिसून आले.
यासोबतच आंब्यांचे नमुनेही घेण्यात आले असून, त्याचे अहवाल प्रलंबित आहे, तर जिल्ह्यात एकूण २५७ नमुने घेण्यात आले. त्यात १५ नमुने असुरक्षित होते, तर ४ नमुने हे बनावट होते. इतर अन्न पदार्थ तपासणी करण्यासाठी ३५८ तपासण्या करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.