बोईसर (बातमीदार) : बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वाढत्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. स्टॉप ओव्हर हॉटेलसमोर रस्त्यावर बंदवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रेलरला मंगळवारी (ता. ८) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भरधाव पिकअप जिपने जोरदार धडक दिली. या अपघातात नागझरी येथील क्रिश क्षत्रीय (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला. चालक कुणाल पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर बेटेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रिश याचे बालपण संघर्षमय होते. लहानपणीच आईने त्याला सोडून दिल्याने त्याचे पालनपोषण आजी आणि आजोबांनी केले. त्यांच्याच आशेचा आधार असलेल्या क्रिशचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.