दुसऱ्या कसोटीत इंग्लंड विरुद्ध धमाकेदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया तिसर्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्यासाठी सज्ज झाली आहे. शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताने इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत 336 धावांनी धुव्वा उडवला. टीम इंडियाचा हा एजबेस्टनमधील कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय ठरला. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला दुसऱ्या सामन्यात वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली होती. मात्र आता जसप्रीत तिसऱ्या सामन्यात खेळणार असल्याचं शुबमनने विजयानंतर स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बुमराहच्या कमबॅकनंतर कुणा एकाला तरी बाहेर व्हावं लागणार, हे निश्चित आहे. त्यामुळे तो एक खेळाडू कोण असणार? याची उत्सुकता चाहत्यांना आहे. भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याने प्लेइंग ईलेव्हनबाबत बोलताना ही उत्सुकता कायम ठेवली आहे.
लीड्स आणि बर्मिंगहॅमनंतर उभयसंघातील तिसरा सामना हा लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचा थरार 10 जुलैपासून रंगणार आहे. टीम इंडियाचा दुसऱ्या सामन्यात विजय मिळवल्याने विश्वास वाढलेला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात यजमान इंग्लंडवर दबाव असणार, हे निश्चित. त्यामुळे टीम इंडिया लॉर्ड्समध्ये विजय मिळवण्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची निवड कशी करते, हे देखील निर्णायक ठरणार आहे.
उपकर्णधार ऋषभ पंत काय म्हणाला?टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. मात्र त्याआधी टीम सिलेक्शनबाबत कर्णधार शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. 3 ऑलराउंडर त्यापैकी 2 स्पिनर घेतल्याने टीकेचा सामना करावा लागला होता.त्यामुळे हे असंच चित्र लॉर्ड्समध्येही पाहायला मिळणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. तिसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला उपकर्णधार ऋषभ पंत याने पत्रकार परिषदेत प्लेइंग ईलेव्हनबाबत उत्तर दिलं. मात्र पंतने स्पष्ट काहीच न सांगता सस्पेन्स कायम ठेवला.
“आमच्यासाठी सर्व पर्याय उपलब्ध आहेत. याबाबत चर्चा सुरु आहे. कधी कधी 2 दिवसात खेळपट्टीचा चेहरामोहरा बदलतो. आम्ही त्यानुसारच निर्णय घेणार आहोत. प्लेइंग ईलेव्हन (3 पेसर+1 स्पिनर) किंवा 3 पेसर+1 स्पिनर/ऑलराउंडर यापैकी कशी असेल? याबाबत निर्णय घेऊ”, असं पंतने म्हटलं.
इंग्लंडकडून प्लेइंग ईलेव्हन जाहीरदरम्यान यजमान इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर करण्यात आली आहे. इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचं संघात 4 वर्षांनंतर कमबॅक झालं आहे. तर जोश टंग याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.