ENG vs IND : लॉर्ड्समध्ये टीम इंडियाची कामगिरी कशी? 19 पैकी किती सामने जिंकले?
GH News July 10, 2025 03:06 AM

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना हा 10 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचं आयोजन हे लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. दोन्ही संघांनी या मालिकेत प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेत आघाडी घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

इंग्लंडने तिसऱ्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हन जाहीर करत आपण सज्ज असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन टॉसवेळेस स्पष्ट होईल. टीम इंडियाने लॉर्ड्समध्ये किती कसोटी सामने जिंकलेत? किती जिंकलेत? हे जाणून घेऊयात.

भारताची लॉर्ड्समधील कामगिरी

टीम इंडियाने या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकूण 19 सामने खेळले आहेत. मात्र भारताची या मैदानात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. भारताने या मैदानात जितके सामने जिंकले नाहीत तितके ड्रॉ केले आहेत.

एकूण किती सामने जिंकले?

टीम इंडियाला लॉर्ड्समध्ये खेळलेल्या 19 पैकी 12 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. भारताला 4 सामने अनिर्णित राखण्यात यश आलं आहे. तर फक्त 3 सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. भारताने या 3 पैकी 2 सामने हे गेल्या 3 दौऱ्यांमध्ये जिंकले आहेत.

मालिका बरोबरीत

उभयसंघातील मालिका 2 सामन्यांनंतर बरोबरीत आहे. इंग्लंडने भारतावर पहिल्या सामन्यात 5 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. इंग्लंडने 371 धावांचं आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं होतं. त्यानंतर टीम इंडियाने दुसरा सामना हा 336 धावांनी जिंकला होता. आता दोन्ही संघांपैकी तिसरा सामना जिंकून कोणता संघ मालिकेत आघाडी घेतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराहचं कमबॅक

इंग्लंडने प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंड टीममध्ये जोश टंग याच्या जागी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याचा समावेश करण्यात आला आहे. तर टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये जसप्रीत बुमराह याचं कमबॅक होणार असल्याचं कर्णधार शुबमन गिल याने दुसऱ्या कसोटीनंतर सांगितलं होतं. त्यामुळे बुमराहसाठी कुणाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात येणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.