कर्जत हे मुळातच सांस्कृतिक ऐश्वर्य लाभलेलं गाव. पण साधारण ९३-९४ ची गोष्ट असेल. कर्जतला ‘सुहास महाजन’ नावाचं एक सुंदर स्वप्न पडलं आणि कर्जतच्या त्या सांस्कृतिक ऐश्वर्यात भर पडली. सर खरंतर उत्तम संवादिनीवादक. त्यांची पत्नी सुप्रिया या उत्तम गायिका; तसंच संवादिनीवादक आणि त्यांची लेक स्वरश्री हीदेखील सरांकडेच गायन व वादनाचे धडे गिरवत असे.
या दोघी आणि त्यांची एक छोटीशी पोमेरीयन असं सुखी चौकोनी कुटुंब घेऊन महाजन सर कर्जतला राहायला आले. काहीच दिवसांत हे कुटुंब संपूर्ण कर्जतमध्ये फेमस झालं. शिवाय अभिनव ज्ञान मंदिरात संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. काही महिन्यांत सरांनी कर्जतमध्ये पहिला शास्त्रीय संगीताचा क्लास सुरू केला.
मला हे सांगताना खूप अभिमान वाटतो, की मी त्या क्लासची पहिली विद्यार्थिनी होते. माझ्या वडिलांच्या प्रत्येक कार्यक्रमाला संवादिनीवर साथ करायला सर असायचेच. हळूहळू आमची कुटुंबं जवळ येत गेली. सर आमच्या समोर राहायला आले. कित्येकदा स्वरश्री माझ्या आजीकडे दुपारी माझ्या बरोबरीनं जेवायची. महाजन कुटुंब प्राणिप्रेमी कदाचीत म्हणून मला त्यांचा जास्त लळा लागला.
सर आणि बाई मला प्रेमानं ‘जुम्मा’ ‘जुड्डा’ अशी हाक मारायचे. स्वरूच्या बरोबरीनं माझ्यावर प्रेम करायचे. सरांचा तर माझ्यावर खास जीव. क्लासला मी फक्त सरांच्या बोटांकडे बघत असायचे. ज्या सहजतेनं सरांची बोटं प्रत्येक स्वरावरून फिरायची, की प्रत्येक स्वर पावन झाल्यासारखं वाटे. सरांना संवादिनीचं मन कळलं होतं.
त्यांच्यासाठी ते फक्त एक वाद्य उरलं नव्हतं, तर त्यांच्या जगण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं. त्या काळात मोठमोठ्या गायकांना सरांनी देशविदेशात जाऊन साथ केली होती. मी त्याना कधी चिडलेलं बघितलंच नाही. जरा डोळे मोठे करून दाखवायचे आणि हलकीशी चापट द्यायचे हाच काय तो त्यांचा राग.
शाळेतल्या, क्लासच्या मुलांवर त्यांचा खूप जीव होता. शाळेतून परत येताना शर्टाच्या खिशात गुलाबाच्या फुलांचे छोटे गुच्छ खुपसलेले असायचे. केवढं ते मुलांचं प्रेम! असा शिक्षक तरी हल्ली कुठे बघायला मिळतो जो मुलांना आई-वडिलांपेक्षा जवळचा वाटावा! विश्वासू वाटावा!
सरांचं आयुष्य अगदी सुखात सुरू होतं. शाळा, क्लासेस, कार्यक्रम सगळं अगदी व्यवस्थित; पण कलाकार हा शापितच असतो हे मी अनुभवलं. सरांचं आजारपण सुरू झालं. आजारही असा, की जो त्यांना त्यांची कला जोपासु देत नव्हता. सरांचा चालताचालता तोल जाऊ लागला, बोटं वाकडी होऊ लागली.
काही काळ कोणालाच निदान होत नव्हतं, की नक्की झालंय काय?... मग कळलं, की त्यांना ‘ॲटेक्सिया’ नावाच्या न्युरॉलॅाजिकल आजारानं ग्रासलं होतं. या आजारात मेंदू शरीराच्या अवयवांना हवे तसे संकेत देत नाही. नसांमधून ताकद कमी होऊ लागते. कधी फिट येते, तर कधी एखादा अवयव अचानक निकामी होऊ लागतो. सरांना पेटी वाजवणं अवघड जाऊ लागलं.
हात-पाय विचित्र बाक आल्यासारखे झाले. तरी सर पेटी काढून बसायचे, सराव करायचे, मुलांमध्ये मन रमवायचे... आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते हसत असायचे. हळूहळू सरांचा एकेक अवयव निकामी होत गेला.. सर अंथरुणाला खिळले. त्या काळात त्यांचं सगळंच बाईंनी मनापासून केलं..
ऐन उमेदीत असा आजार होणं, तेही एका कलाकाराला- यात मानसिक खच्चीकरण किती होत असेल!! तरीही बाई नाउमेद झाल्या नाहीत. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला गेले, तेव्हा तेव्हा बाई सरांचं सगळं अगदी प्रेमानं करत असायच्या. पुढे त्यांच्या मुलीला- स्वरूताईलाही त्याच आजारानं ग्रासलं. माझ्यापेक्षा जेमतेम दोन वर्षं मोठी ती.
तिला असं बघताना आम्हा सगळ्यांनाच खूप त्रास व्हायचा. सरांची प्रकृती हळूहळू खालावत चालली होती. बुद्धीला जे माहीत होतं, ते मन मानायला तयार नव्हतं. एक कलाकार आम्हाला सोडून जाणार नव्हता, तर त्याची कलाही त्याच्याबरोबर जाणार होती... एक सच्चा माणूस जाणार होता.. मी जमेल तशी सरांना भेटायला जात होते.. प्रत्येकवेळी त्यांना हेच सांगत होते, की लवकर बरे व्हाल...
औषधउपाय झाले, देवधर्म, नवस, व्रतं असं सगळं करून झालं; पण सर बरे होतच नव्हते. गेल्या वर्षी सहा मेला मी सेटवर असताना मेसेज आला, की सर गेले.. संवादिनीचे सूर कायमचे शांत झाले होते... मी तिथेच रडायला लागले... मला काही करून सरांना भेटायचंच होतं.. मढ ते मुलुंड हा प्रवास त्या दिवशी दहा तासांचा वाटत होता.
सरांबरोबरचा एकेक क्षण आठवत होता... त्यांची सगळ्यात लाडकी विद्यार्थिनी होते मी... आणि माझेही लाडके सर होते ते.. मित्र होते.. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझे संगीताचे गुरू होते.. मला जी काही सुरांची ओळख झाली ती सरांमुळे... संगीताची गोडी त्यांनी लावली... आज गुरूपौर्णिमेनिमित्त सरांना काय गुरूदक्षिणा द्यावी असा प्रश्न पडला... आणि त्यांची एकच शिकवण आठवली...‘कलाकार’ कितीही मोठी झालीस तरी माणूस म्हणून त्याहीपेक्षा मोठी हो जुम्मा...
आज सर नाहीत.. पण त्यांची शिकवण, त्यांचे सूर, त्यांचा आवाज मी कायम माझ्याबरोबर ठेवणार… हीच काय ती गुरूदक्षिणा!