कुणीही कितीही मेळावे घेतले, मोर्चे काढले तरी त्रिभाषा सूत्राला पर्याय नाही, हे सर्वांनी मनावर बिंबवून घेतले पाहिजे. ज्याला आपण सर्वसाधारणपणे मराठी भाषेत महाराष्ट्र असे म्हणतो ते वस्तुत: एक राज्य आहे. नुसतेच राज्य असले तरी ते पुरोगामी आणि प्रगतही आहे, हे एक विशेष होय.
कां की या राज्यात राहणाऱ्या मनुष्यांस अनेक भाषा आपापत:च येत असल्याने नवीन काही शिकण्याची फारशी गरज नसते. शिवाय सध्याच्या काळातील राजकीय भाषा पाहू गेल्यास बोलण्यासारखेच काही उरलेले नाही, हे सहजपणे कळून येईल. आता बोलण्यासारखेच काही नसले तर तीन-तीन भाषांची गरज काय हेच आम्हाला कळत नाही. असो.
सांप्रतकाळी, त्रिभाषा धोरणानुसार पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा इरादा सरकारने तूर्त सोडून दिला असून याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी एकसूत्री समिती नेमून टाकली आहे. काहीही झाले किंवा न झाले तरी, समित्या नेमणे हे काम कुठल्याही सरकारला करावेच लागते.
पहिलीच्या क्रमिक पुस्तकातही ‘छगन कमल देख’ हा धडा असलाच पाहिजे की नाही, याचा निर्णय सदरील समिती येत्या दोन-तीन किंवा साताठ किंवा दहावीस महिन्यात किंवा वर्षात घेईल. तोवर हिंदी अनिवार्य नसेल. त्रिभाषा सूत्रानुसार आधी हिंदी सक्तीची होती, नंतर ती अनिवार्य झाली.
हाणामाऱ्या होऊन प्रकरण अंगलट येते आहे, हे पाहून मायबाप सरकारने कायमची हिंदी हटवून द्विभाषा सूत्र अवलंबिले. तथापि, यामुळे बरेच प्रश्न निर्माण होणार असून आपल्या मुलाबाळांचे भविष्य अवघड होऊन बसले आहे. कसे ते पहा :
आम्हाला विचाराल तर (पण कां विचाराल?) त्रिभाषा सूत्र गरजेचे आहे. परंतु, त्या त्रिभाषा मराठी, इंग्रजी आणि हिंदी या नव्हेतच!! या तिन्ही भाषा पूर्णत: कालबाह्य झाल्या असून मराठी भाषा तर अभिजात याने की प्रमाणपत्रित प्राचीन आहे. इंग्रजीचेही असेच गूढ आहे. उदाहरणार्थ, एखाद्या सामान्य मराठी माणसास (इथे आम्ही आमचेच उदाहरण घेऊ!) इंग्रजीत बोलायची वेळ आली तर तो ‘याऽऽ..याऽऽ…येस, नो…लेकिन..’ अशी मखलाशीयुक्त शब्दयोजना करत हिंदीत शिरतो!! ‘आय टोल्ड हिम कीऽ….’ अशी सुरवात करुन हिंदीचा आधार घेतो. त्याअर्थी हिंदी ही आधार भाषा आहे. आता आधारभाषा शिकावी की न शिकावी?
पहिलीपासून हिंदी शिकवली नाही तर मराठी मुले अभ्यासात मागे पडतील, एवढी साधी गोष्ट हिंदीविरोधकांना समजत नाही. पहिलीपासून हिंदी शिकले नाही तर मराठी मुलांची प्रगती कशी होणार? हिंदी ही काही आपली राष्ट्रभाषा नाही. तरीही ती शिकली नाही तर मराठी मुलांना धड मराठीही येणार नाही, आणि इंग्रजीही येणार नाही. पटक पटक के मारेंगे...या सुभाषिताचा अर्थ आपल्या मुलांना कळला नाही, तर ती किती मागे पडतील नाही? शिवाय तिसरी भाषा शिकण्यास विरोध केला तर पुढेमागे फ्रेंच, अर्धमागधी, इटालियन, तामीळ, स्पॅनिश, क्रियोळ, पापुआ न्यूगिनी येथे जी भाषा बोलली जात असेल ती, अशा कितीतरी भाषा शिकणे कठीण जाणार आहे.
हिंदीमुळे अनेकांची डोकी उठणे आम्ही समजू शकतो, पण हल्ली ती फुटतात! ही डोकेफोड थांबवायची असेल तर त्रिभाषा सूत्रात एक बदल अनिवार्य (पक्षी : सक्तीचा) करावा. आमच्या मते मायमराठी व्यतिरिक्त ‘पायथॉन’ आणि ‘पैशाची’ या दोन भाषा भविष्यात उपयोगी पडतील.
‘पायथॉन’ ही कृत्रिम प्रज्ञेची भाषा आहे, आणि ती अजगरासारखी जगास गिळू पाहात आहे. ती सक्तीने शिकवावी.
दुसरे अति महत्त्वाचे म्हणजे पैशाची भाषा बोलण्यास मुलांना पहिलीपासून शिकवावे!! कारण हल्ली ही पैशाची भाषाच राष्ट्रभाषाच नव्हे, तर विश्वभाषा ठरली आहे!