- अश्विनी आपटे- खुर्जेकर
माझ्या कामाच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या लोकांना भेटते आणि बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं म्हणताना ऐकते, की माझ्यात पुरेसा आत्मविश्वासच नाही. आता खरं पाहायला गेलं, तर आत्मविश्वास ही कुणी दुसऱ्याने देण्याची गोष्ट नाही.
तो आपल्या स्वतःच्या प्रयत्नातून, अनुभवातून आणि स्वतःकडील सकारात्मक दृष्टिकोनातून तयार होतो. आत्मविश्वास वाढवणं ही आपल्या स्वतःच्या जबाबदारीची गोष्ट आहे. माझ्यासारखी व्यक्ती तुम्हाला मदत नक्की करू शकते; परंतु आत्मविश्वास वाढवण्याची सुरुवात तुम्हाला तुमच्यापासूनच करावी लागते.
आता हेच बघा ना. आपल्यापैकी बरेच जण स्वतःकडे पाहताना आपल्यात काय कमतरता आहे हे बघतात. आपल्याला काय येत नाही, काय करायचं राहून गेलं, एखादी गोष्ट का जमली नाही वगैरे बोललं जातं; पण ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या जमतात, ज्या गोष्टी आपण यशस्वीपणे पार पाडल्या आहेत, त्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आणि यामुळेच आपला आत्मविश्वास डळमळीत होतो.
घर, कुटुंब, दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडतापाडता आपण स्वतःकडे लक्ष देणंच विसरून जातो आणि मग आपल्या मनात माझ्यात काही खासच नाही, मी काय करणार अशी भावना निर्माण होते. खरं तर प्रत्येक माणसात काही ना काही खास असतं. कोणाला स्वयंपाक चांगला जमतो, कोणाचं बोलणं लोकांना समाधान देतं, कोणाचं व्यवस्थापन उत्तम असतं; पण आपण मात्र हे सगळं स्वतःचं सामर्थ्य आहे असं समजतच नाही.
त्यामुळे मैत्रिणींनो, सर्वांत आधी आपण आपलं स्वतःचं सामर्थ्य ओळखायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. बस, एक वही पेन घ्या आणि ‘मला काय छान जमतं, लोक माझ्या कुठल्या गोष्टीचं कौतुक करतात, माझ्या कुठल्या सवयीमुळे किंवा कामांमुळे मला आनंद मिळतो,’ असं स्वतःला विचारा आणि हे सगळं लिहून ठेवायला लागा. हळूहळू तुमच्या लक्षात येईल, की तुमच्यातही असे अनेक चांगले गुण आहेत- जे आजवर दुर्लक्षित राहिलेत.
लिहून ठेवण्याने अजून एक फायदा होईल. जेव्हा कधी तुम्हाला निराश वाटेल किंवा तुमचा आत्मविश्वास डगमगतोय असं वाटेल, तेव्हाही वही उघडून वाचा. तुमच्यासाठी या वहीत लिहिलेल्या गोष्टी तुमचं पॉझिटिव्ह रिमाइंडर ठरेल. आपण काय काय करू शकतो याची जाणीवच तुम्हाला नव्याने ऊर्जा देईल.
मैत्रिणींनो एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वतःचं मूल्यमापन करणं म्हणजे अहंकार नाही. आपल्या गुणांबद्दल, क्षमतांबद्दल, यशांबद्दल अभिमान बाळगणं चुकीचं नाही. उलट त्यामुळेच तुमचं मानसिक बळ वाढतं. आपण नेहमी इतरांचं कौतुक करतो, त्यांच्या क्षमतेला मान देतो; पण स्वतःच्या सामर्थ्याकडे मात्र दुर्लक्ष करतो; परंतु आता ही गोष्ट बदलायला हवी.
स्वतःची ताकद ओळखणं म्हणजेच स्वतःला संधी देणं. पुन्हा नव्यानं पाहण्याची, स्वतःवर विश्वास ठेवण्याची. जेव्हा तुम्ही तुमच्यातल्या चांगल्या गोष्टी ओळखता, त्याची नोंद ठेवता, त्याचं कौतुक करता, त्या गोष्टी तुमच्या आत्मविश्वासाचा पाया बनतात. त्या पायावर तुमचं व्यक्तिमत्व मजबूत होतं.
त्यामुळे अधूनमधून स्वतःच्या आयुष्याकडे वळून बघा. तुम्ही एकाच वेळेला किती भूमिका निभावताय, किती गोष्टी शिकताय, किती अडचणींना सामोऱ्या जाताय आणि त्यातून पुन्हा कशा उभ्या राहताय, हे सगळं तुमचं सामर्थ्य आहे याची नोंद घ्या आणि त्याचा अभिमान बाळगा.
आत्मविश्वास ही काही जादू नाही. ती एक सवय आहे. रोज थोडं थोडं करून ती अंगी करावी लागते. त्यामुळे आजपासूनच सुरुवात करा. तुमच्यातल्या चांगुलपणाला, क्षमतेला आणि धैर्याला ओळखा. तुमचं आत्मभानच आत्मविश्वास घडवणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एकदा तुम्ही स्वतःला ओळखायला लागला, की संपूर्ण जगही तुम्हाला नव्यानं ओळखेल.