Breaking: भारतीय टेनिसपटूची वडिलांकडून ३ गोळ्या घालून हत्या; कोण होती राधिका यादव?
esakal July 11, 2025 12:45 AM

Who was Radhika Yadav? Tennis player killed by father in Gurugram

हरियानाच्या गुरुग्राममध्ये गुरुवारी २५ वर्षीय राज्यस्तरीय टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. ही घटना राधिका यादव हिच्या गुरुग्रामच्या सेक्टर ५७ मधील घरातील पहिल्या मजल्यावर सकाळी १०:३० वाजता घडली, असे वृत्त indiatoday.in ने पोलिसांचा हवाला देत दिले आहे. प्राथमिक माहितीनुसार, राधिका यादवच्या वडिलांनी तिच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या. पण, ही हत्या का केली गेली, हे अद्याप समजलेले नाही.

राधिका यादव हिला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, असे अहवालात म्हटले आहे. "आम्हाला रुग्णालयाकडून माहिती मिळाली की, एका २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तिला तीन गोळ्या लागल्या आहेत. आम्ही महिलेच्या काकांना भेटलो पण त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यानंतर आम्ही घटनास्थळी गेलो जिथे आम्हाला कळले की महिलेच्या वडिलांनी तिच्यावर गोळीबार केला आहे," असे गुरुग्राम सेक्टर ५६ पोलिस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले.

राधिका यादव कोण होती?
  • राधिका यादवची आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशन (ITF)मध्ये दुहेरी रँकिंगमध्ये ११३ व्या क्रमांकावर होती. राधिका यादवचा जन्म २३ मार्च २००० रोजी झाला होता.

  • महिला दुहेरी प्रकारात ती हरियाणामध्ये पाचव्या क्रमांकावर होती आणि आंतरराष्ट्रीय क्रमवारीत ती पूर्वी भट्ट (१०९) आणि थानिया सराई गोगुलामंडा (१२५) सारख्या इतर प्रमुख भारतीय खेळाडूंच्या आसपास होती.

राधिका २२ जानेवारी २०१८ रोजी एआयटीए मुलींच्या १८ वर्षांखालील गटात ७५ व्या स्थानावर पोहोचली होती आणि टॉप १०० मध्ये ती ११ आठवडे होती. ८ जानेवारी २०१८ रोजी ९४ व्या स्थानाने तिचा प्रवास सुरू झाला. हरियाणाची असलेली ती एआयटीए महिला दुहेरीत टॉप १०० मध्ये स्थान मिळवणाऱ्या राज्यातील फक्त चार खेळाडूंपैकी एक होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.