महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार, या तारखेनंतर पुन्हा मुसळधार
Tv9 Marathi July 11, 2025 03:45 PM

Monsoon Update: बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. गेली दोन, तीन दिवस मुसळधार पाऊस झालेल्या विदर्भात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने विश्रांती दिल्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील पूर वेगाने ओसरला आहे. राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण असूनही पावसाने ब्रेक घेतला आहे. आता विदर्भात पुढील तीन-चार दिवस पाऊस असणार आहे. त्यानंतर 15 जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर कमी होणार आहे. 20 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहे.

15 जुलैपासून पावसाचा जोर कमी होणार

बंगालच्या खाडीत तयार झालेला कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे विदर्भात पावसाने विश्रांती आहे. परंतु 11 ते 14 जुलै या कालावधीत राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज कायम आहे. त्यानंतर 15 जुलैपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

राज्यातील विदर्भ, मराठवाडा वगळता इतर भागात जून महिन्यांत पावसाची तूट निर्माण झाली होती. त्यानंतर जुलै महिन्यातही मराठवाडा आणि विदर्भात पाऊस आला नव्हता. परंतु गेल्या चार दिवसांत विदर्भात दमदार पाऊस झाला. जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. या पावसाने तूट भरुन निघाली आहे.

पूर ओसरला, विदर्भात जनजीवन सामान्य

तीन दिवसानंतर गोंदियात पाऊस थांबला आहे. त्यामुळे पूरस्थिती ओसरली आहे. गोंदिया, देवरी, अर्जुनी परिसरात पूर ओसरला आहे. तीन दिवसांतील मुसळधार पावसानंतर जिल्ह्यात 21 मार्ग बंद झाले होते. ते आता पुन्हा सुरु झाले आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली होती. महसूल विभागाकडून पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाने 55 घरांची पडझड झाली आहे. शेकडो हेक्टर शेतीत पुराचे पाणी गेले होते. मुसळधार पाऊस आणि गोसेखुर्द धरणामुळे वैनगंगा नदीला आलेल्या पुराने तालुक्यातील 8 गावांना वेढा घातला होता. आता पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणातील पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीला पूर ओसरत आहे. यामुळे काही मार्ग सुरू झाले आहेत. पुरामुळे बंद असलेले गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग दोन तासांत सुरू होणार आहे. चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग सुरू होण्याची शक्यता आहे. वैनगंगा प्राणहिता गोदावरी नदी शंभर टक्के भरून वाहत असल्यामुळे नदीकाठी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.