Sanjay Gaikwad : मारहाण भोवली, गुन्हा दाखल; तरीही गायकवाडांची मुजोरी कायम!
Marathi July 11, 2025 10:25 PM

आमदार निवासातल्या कँटीनमध्ये गुंडगिरी करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतल्या मरीन ड्राइव पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. निकृष्ट जेवणावरून गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कँटीनमधल्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती. एबीपी माझाने या घटनेचा गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला, त्यानंतर ही कारवाई झाली. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५२ नुसार अपमानित करणं, कलम ११५(२) नुसार मारहाण करणं आणि कलम ३०५ नुसार संगनमत करून मारणं या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊनही गायकवाड यांची मग्रुरी कायम आहे. “मी मारहाण केलेली आहे, मला पश्चाताप नाहीये. आई डोंट केअर,” असे गायकवाड यांनी म्हटले आहे. या कारवाईवरून सत्ताधाऱ्यांमध्येच धुसफूस पाहायला मिळत आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी तक्रार नसल्याने कारवाई करता येणार नाही असे म्हटले होते, तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा दावा खोटा ठरवत, तक्रार नसतानाही चौकशी करता येते असे स्पष्ट केले. विरोधकांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या असून, अध्यक्षांनी कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आमदार निवासात मारहाण करणाऱ्या संजय गायकवाड यांनी एमआयएमचे माजी आमदार इम्तियाज जलील यांनाही मारण्याची धमकी दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.