हे जनसुरक्षा नाही भाजपच्या सुरक्षेचं विधेयक; उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका
Marathi July 11, 2025 10:25 PM

टाडा कायद्याप्रमाणे या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच हे जनसुरक्षा नव्हे तर भाजपच्या सुरक्षेचं विधेयक आहे असेही उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल आणि आज विधिमंडळामध्ये जनसुरक्षा कायदा या नावाने एक कायदा आणला जातोय. काल विधान कालच्या सभागृहात बहुमताच्या जोरावर तो मंजूर करण्यात आला. साहजिकच आहे सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत आहे आणि त्याचा दुरुपयोग करत आहेत. आमचा याला नेमका विरोध आहे. यांच्या कथनी आणि करनी मध्ये फरक आहे. ते सांगतात की नक्षलवादाचा, दहशतवादाचा बिमोड करायचा आहे. परंतु या कायद्याचा जो काही मसूदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये. सुरुवातीला फक्त कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनाचा उल्लेख होता. आतापर्यंत मी कडवे वाल हा शब्द ऐकला होता, कडव्या डाव्या हा शब्द पहिल्यांदा ऐकतोय. डावा आणि उजवं याच्यामधला फरक करण्याची आवश्यकता आहे. शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा सोबत आम्ही होतो. आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत. कारण आम्ही धर्म मानणारे आहोत. खरं म्हणजे डावा आणि उजवं करण्याची गरज नाही. आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता आहे. ही डावी विचारसरणी आहे का उजवी विचारसरणी आहे? हा फरक त्यातून कळत नाहीये. जर देशविघातक शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही. आम्ही नक्कीच सरकार सोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याच कारण नाहीये. परंतु जर का तुम्ही राजकीय हेतूंनी प्रेरित हे बिल आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय. याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे असं काही शब्दच नाहीये. या कायद्यात म्हटलंय की बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले आहे. याच्यात कुठेही दहशतवाद, नक्षलवाद हा शब्द नाहीये. म्हणजे सर्वसामान्य जनतेलासुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात. पूर्वी जसा मिसा आणि टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मला असं वाटतं या कायद्याचं नाव भाजप सुरक्षा कायदा केला पाहिजे. कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे. म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही यातले शब्द आहेत त्याच्यात सुधारणा करा. त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दांमध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे का आहेत नक्षलवादी याचा उल्लेख करा आणि परत बिल आणा. पण असं जर का मोघम बिल आणलं की ज्याला काय आकार, उकार, शेंडा बुडखा काही नाही. पूर्वी जसं मी म्हटलं की मिसा आणि टाडा कायदा होता. टाडाचा जसा दुरुपयोग झाला तसाच या कायद्याचाही दुरुपयोग होईल. याचं स्पष्ट चित्र आज आम्हाला म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं. कारण आमच्याकडून बोलणारे कोण होते अनिल परब, सचिन अहीर हे शिवसैनिक. अभिजीत काँग्रेस तिघेच जण बोलले. पण त्यांच्याकडून जे जे बोलले अगदी बिल कोणी मांडलं योगेश कदम मूळचा शिवसैनिक, दरेकर, त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपाचा नाही. या धमकावण्याला बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडून हे बिल आणलं जात आहे. या कायद्याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा आक्षेप आहे. जोपर्यंत नक्षलवाद आणि दहशतवाद असा कायद्याच्या मसुद्यात हे शब्द येत नाही तोवर आमचा विरोध आहे. दहशतवादाचा बिमोड केलाच पाहिजे. पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला. तिथे धर्म विचारून गोळ्या घातल्या. मग हा डाव्या विचारसरणीचा दहशतवाद की उजव्या विचारसरणीचा दहशतवाद होता? त्या दहशतवाद्यांना अद्याप पकडलेले नाही, का? जो कोणी दहशतवादी असेल, नक्षलवादी असेल त्याची जात, पात, धर्म न पाहता त्याला शिक्षा केलीच पाहिजे. पण या कायद्यानुसार ते तेवढ्यापुरते मर्यादित राहत नाही. म्हणून आम्ही सांगितलं की या कायद्यात सुधारणा करा आम्ही न विचारता तुम्हाला पाठिंबा जाहीर करू. नक्षलग्रस्त भागात आपल्या पोलिसांच्या आणि सीआरपीएफ जवानांच्या जोरावर हा भाग आपण नक्षलमुक्त करत आहोत. हा कायदा नसताना आपण नक्षलवाद संपवू शकतो मग हा कायदा कशासाठी? माओवाद्यांना तुम्ही शोधा आणि शिक्षा द्या. पण सर्वात जास्त माओवादी चीनमध्ये आहे आणि चीन अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये घुसतोय त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही आहात असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.