दिल्लीत एका वडिलांनी आपल्याच टेनिसपटू असलेल्या मुलीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. राधिका यादव असे या मुलीचे नाव असून ती राज्यस्तरीय टेनिस खेळाडू होती. गुरुग्रामच्या सेक्टर-५७ परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. एका क्षुल्लक कारणामुळे राधिकाच्या वडिलांनी तिची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
नेमकं काय घडलं?राधिका यादव असे मृत टेनिसपटू मुलीचे नाव आहे. तिचे वडील दीपक यादव यांनी तिला गोळ्या घालून ठार केले. राधिका तिच्या घराच्या पहिल्या मजल्यावर स्वयंपाकघरात काम करत असताना हा प्रकार घडला. ही हत्या करण्यामागे जे कारण समोर आले आहे, ते खूपच धक्कादायक आहे. दीपक यादव यांनी आपली परवानाधारक .३२ बोअरची रिव्हॉल्वर काढली. lf;d/e पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या. त्यावेळी घरात दीपक यादव, त्यांची पत्नी मंजू यादव आणि राधिका हे तिघेच होते. मंजू यादव तापाने आजारी असल्याने खोलीत आराम करत होत्या. त्यांना फक्त गोळीबाराचा आवाज ऐकू आला. गोळीबाराचा आवाज ऐकून राधिकाचे काका आणि चुलत भाऊ लगेच स्वयंपाकघरात गेले. तिथे त्यांना राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सुरुवातील तपासात दिशाभूलयानंतर सुरुवातीला कुटुंबातील काही सदस्यांनी पोलिसांना राधिकाने स्वतःला गोळी मारल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कठोर चौकशी केली. तसेच घटनास्थळावरून सर्व पुरावे गोळा केले. यानंतर पोलिसांनी दीपक यादव यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर दीपक यादवने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दीपक यादव यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी राधिकाचे काका कुलदीप यादव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक यादवविरुद्ध हत्या कलम १०३(१) BNS आणि शस्त्र अधिनियम कलम २७(३), ५४-१९५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मृत्यूचे कारण समोरयावेळी पोलीस राधिकाच्या मृत्यूची चौकशी करत असताना त्यांनी दीपक यादवला तिची हत्या करण्यामागचे कारण विचारले. त्यावेळी त्यांनी धक्कादायक उत्तर दिले. आरोपी दीपक यादवने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, गावातील लोक मला नेहमी टोमणे मारायचे की तू तुझ्या मुलीच्या कमाईवर जगतो. मुलीच्या पैशांवर मजा करतोय, कधीपर्यंत मुलीच्या कमाईवर जगणार, असे टोमणे त्याला सतत ऐकायला मिळायचे. या टोमण्यांमुळे दीपक यादव खूप मानसिक तणावात होते. याच मानसिक त्रासातून त्यांनी हे भयंकर पाऊल उचलले. राधिका एक खूप चांगली टेनिस खेळाडू होती आणि तिने अनेक राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्या होत्या. खांद्याला दुखापत झाल्याने तिने सध्या स्वतःची टेनिस अकादमी सुरू केली होती.