पालिका निवडणुका 3 टप्प्यात? राज्य निवडणूक आयोगाकडून मोठी अपडेट काय?
Tv9 Marathi July 11, 2025 05:45 PM

स्थानिक स्वराज्य संस्थातंर्गत महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. कार्यकर्ते, पुढारी, नेते, नगरसेवकांचा गेल्या पाच वर्षांचा वनवास आता संपणार आहे. आता शहराशहरात आणि गावागावात चैतन्य संचारणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगर पालिका, महापालिकांमध्ये निवडणुकीचे वारे घुमू लागले आहे. त्यातच पालिका निवडणुका तीन टप्प्यात घेण्याची शक्यता समोर येत आहे. 1 जुलै पर्यंतची मतदार यादी वापरावी असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये पालिका निवडणुका

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निर्देश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकांमध्ये मतदारांची संख्या वाढेल असा अंदाज आहे. प्राथमिक तयारीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि जिल्हाधिकारी यांच्यातील बैठक पार पडली आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पालिका निवडणुकीचा बार उडणार असल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांसाठी हा सुगीचा हंगाम ठरेल.

एकूण 676 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून रखडल्या होत्या. या सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी आयोगाला 6.5 लाख ईव्हीएमची गरज आहे. अपुऱ्या ईव्हीएम संख्येमुळे एकाच टप्प्यात मतदान घेणे अशक्य आहे. ईव्हीएमची संख्या कमी असल्याने आयोग स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर येत आहे.

सप्टेंबरमध्ये प्रभाग रचना

तर एका अपडेटनुसार, येत्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच प्रभाग रचना पूर्ण होऊ शकते. वेळापत्रकानुसार, ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार आहे. २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान मुंबई महापालिका, राज्यातील अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. महापालिका आणि नगरपालिकांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम नगरविकास विभागाने अगोदरच जाहीर केला. त्यानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही प्रभाग रचना पूर्ण केली जाईल.

अ, ब आणि क दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना ही २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान जाहीर केली जाईल. तर ड दर्जाच्या महापालिकांची अंतिम प्रभाग रचना २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या दरम्यान जाहीर होईल. नगर परिषदा आणि नगरपंचायतींची अंतिम प्रभाग रचना ही राज्य निवडणूक आयुक्त २२ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान जाहीर करतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.