ऋषभ पंतच्या जागी ध्रुव जुरेल करतोय विकेटकीपिंग, फलंदाजी करू शकतो का? आयसीसी नियम सांगतो की..
GH News July 11, 2025 07:08 PM

भारत इंग्लंड कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशीही ऋषभ पंत विकेटकीपिंगसाठी उतरला नसल्याने चिंता वाढली आहे. पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराह 34वं षटक टाकत असताना ऋषब पंतला दुखापत झाली. त्यानंतर तो विकेटकीपिंगसाठी उतरलाच नाही. म्हणून त्याची जागी ध्रुव जुरेलने विकेटकीपिंग केली. पुढची 49 षटकांसाठी त्याने विकेटकीपिंग केली. पण दुसऱ्या दिवशीही तसंच चित्र दिसल्याने टेन्शन वाढलं आहे. पंत सामन्यात खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पंतच्या जागी ध्रुव जुरेल फलंदाजी करू शकता का? असा प्रश्न आहे. 2019 पर्यंत क्रिकेटमध्ये पर्यायी खेळाडूचा नियम नव्हता. 2019 मध्ये आयसीसीने कन्कशन रिप्लेसमेंट नियम आणला. या नियमानुसार, एखाद्या खेळाडूला डोक्याला दुखापत झाली तर त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करता येते. पण संघात येणाऱ्या खेळाडूची भूमिका बाहेर पडणाऱ्या खेळाडूसारखीच असली पाहिजे. पण ऋषभ पंतला डोक्याला दुखापत झाली नाही. त्याच्या बोटांना दुखापत झाली आहे.

आयसीसीच्या खेळण्याच्या अटींच्या कलम 24.1.2 नुसार, “बदलीचा खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी करू शकत नाही. तसेच कर्णधार म्हणून काम करू शकत नाही. परंतु पंचांच्या संमतीनेच तो यष्टीरक्षक म्हणून काम करू शकतो.” 2017 पर्यंत पर्यायी विकेटकीपरचा नियम नव्हता. एमसीसीने गंभीर दुखापत किंवा आजाराच्या बाबतीत पर्यायी विकेटकीपरचा नियम लागू केला. पण यासाठी पंचांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ध्रुव जुरेल फलंदाजी किंवा गोलंदाज करू शकणार नाही. म्हणजेच ऋषभ पंत खेळला नाही तर भारताचे फक्त 10 खेळाडूच फलंदाजी करू शकतात.

ऋषभ पंत जबरदस्त फॉर्मात आहे. आतापर्यंत केलेल्या चार डावात त्याने दोन शतकं आणि एक अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटीतही त्याच्या फलंदाजीची संघाला आवश्यकता आहे. बीसीसीआयने पंतच्या दुखापतीबद्दल माहिती देताना स्पष्ट केलं की, “टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या डाव्या तर्जनीला चेंडू लागला आहे. तो सध्या उपचार घेत आहे आणि वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल यष्टीरक्षक आहे.”

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.