इन्कम टॅक्सकडून नोटीस मिळाल्याच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण, म्हणाले…
Tv9 Marathi July 11, 2025 07:45 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस मिळाल्याची चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे मंत्री आणि शिंदे यांचे विश्वासू नेते संजय शिरसाट यांनीच श्रीकांत शिंदेंना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचं विधान केलं होते. यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलेल्या आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाल्याच्या वृत्ताचे खंडन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्वतः याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

शिवसेनेचे मंत्री आणि शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले संजय शिरसाट यांनी केलेल्या एका विधानामुळे या चर्चांना सुरुवात झाली. संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना मला आणि श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्याचे म्हटले होते. संजय शिरसाट यांना २०१९ ते २०२४ या कालावधीतील त्यांच्या संपत्तीतील वाढीबद्दल प्राप्तिकर विभागाने स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आल्याचे त्यांनी नमूद केल्याने उलटसुलट चर्चा सुरु होत्या.

संजय शिरसाट काय म्हणाले?

संजय शिरसाट यांच्या विधानानंतर काही वेळातच त्यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. त्यांच्या सुरुवातीच्या विधानानंतर लगेचच त्यांनी यू-टर्न घेतला. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाने कोणतीही नोटीस बजावलेली नाही.

श्रीकांत शिंदेंचे स्पष्टीकरण

आता या सर्व घडामोडींवर श्रीकांत शिंदे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. काही प्रसारमाध्यमांनी संजय शिरसाट यांच्या तोंडी हे वाक्य घालून त्याचा विपर्यास केल्याचा दावाही श्रीकांत शिंदेंनी केला. यावरून स्पष्ट होते की खासदार श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाकडून कोणतीही नोटीस आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.