Joe Root : जो रूट याचं लॉर्ड्समध्ये आणखी एक शतक, राहुल द्रविडचा रेकॉर्ड ब्रेक
GH News July 11, 2025 10:08 PM

इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट याला टीम इंडिया विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात शतक करता आलं नाही. मात्र रुटने तिसऱ्या सामन्यात शतक करुन भरपाई केली आहे. रुटने ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी अविस्मरणीय शतक ठोकलं आहे. जो रुट याने या शतकासह इंग्लंड चाहत्यांची मनं जिंकली. तसेच जो रुट याने शतकी खेळीसह 1 विक्रम मोडीत काढला आहे. तर एका विक्रमाची बरोबरी साधली आहे. रुटने नक्की काय केलं? हे सविस्तर जाणून घेऊयात.

रुट पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 99 धावांवर नाबाद परतला. त्यामुळे रुट दुसऱ्या दिवशी शतक करण्यात यशस्वी होणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र रुटने दुसऱ्या दिवसातील पहिल्याच बॉलवर फोर ठोकून शतक पूर्ण केलं. रुटने 192 बॉलमध्ये 53.65 च्या स्ट्राईक रेटने हे शतक पूर्ण केलं. रुटने या खेळीत 10 चौकार ठोकले. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 37 वं तर टीम इंडिया विरुद्धचं 11 वं शतक ठरलं.

राहुल द्रविडचा रेकॉर्ड ब्रेक

जो रुट याने या शतकासह टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथ या दोघांच्या 36-36 कसोटी शतकांचा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच रुटने स्टीव्हन स्मिथ याच्या विक्रमाची बरोबरी केली. स्मिथनेही टीम इंडिया विरुद्ध 11 शतकं झळकावली आहेत. रुट यासह कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहचला. तसेच रुट सर्वाधिक शतकं करणारा सक्रीय फलंदाजही ठरला आहे.

दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 51 शतकं केली आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी ऑलराउंडर जॅक कॅलिस विराजमान आहे. तिसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे. तर चौथ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर कुमार संगकारा विराजमान आहे.

जो रुटचं लॉर्ड्समधील आठवं शतक

सर्वाधिक कसोटी  शतकांचा विक्रम

  1. सचिन तेंडुलकर : 51 शतकं
  2. जॅक कॅलिस : 45 शतकं
  3. रिकी पॉन्टिंग : 41 शतकं
  4. कुमार संगकारा : 38 शतकं
  5. जो रुट : 37 शतकं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.