नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीला काल मुसळधार पावसाने झोडपल्यानंतर आज सकाळी नऊच्या सुमारास भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. दिल्लीच्या शेजारचे राज्य असलेल्या हरियानातील झज्जर हे भूकंपाचे केंद्र होते.
भूकंपमापन केंद्राने नोंदविलेल्या तपशिलांनुसार आज सकाळी ९.०४ वाजता हरियानातील झज्जर येथे ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. यामुळे दिल्लीसही भूकंपाचे धक्के बसले. दैनंदिन कामकाज आणि कार्यालये सुरू होण्याची वेळ असताना आलेल्या या भूकंपामुळे दहा सेकंदांपर्यंत जमिनीला हादरे बसल्याने अनेकांनी घाबरून घरातून व कार्यालयांमधून बाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यांमुळे घाबरून लोक घरातून आणि कार्यालयातून बाहेर पडले.
या धक्क्यांचा परिणाम दिल्लीतील मेट्रो वाहतुकीवरही झाला. मेट्रोच्या संचालन प्रक्रियेच्या नियमावलीनुसार सावधगिरीचा उपाय म्हणून भूकंपाचे हादरे बसल्यानंतर मेट्रो सेवा दोन ते तीन मिनिटे थांबविण्यात आली होती.
त्यानंतर मेट्रोसेवा सुरळीत झाली. दक्षिण दिल्लीसह दिल्ली शहरात त्याचप्रमाणे नोएडा आणि गाझियाबाद या भागांमध्ये भूकंपाचे हादरे स्पष्टपणे जाणवले. यासोबतच गुरुग्राम, फरीदाबाद, जिंद, रोहतक, भिवानी, बहादुरगड या हरियानातील शहरांमध्ये देखील भूकंपामुळे जोरदार हादऱ्यांची नोंद झाली.
Amit Shah: पूरग्रस्त राज्यांना भरीव आर्थिक मदत; अमित शहा यांची सोशल मीडियावर ‘पोस्ट’नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीचे शास्त्रज्ञ आर. के. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९.०४ वाजता भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल होती आणि खोली सुमारे १० किलोमीटर होती. हा मध्यम तीव्रतेचा भूकंप असल्याने त्यापासून फारसा धोका नसल्याचेही सिंग यांनी नमूद केले.