हिंसाचार शमविण्यासाठी कुकी-मैतेई समुदायाची संयुक्त बैठक घेणार : केंद्राची विशेष योजना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मणिपूरमध्ये मे 2023 पासून सुरू असलेल्या वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार कुकी आणि मैतेई समुदायाच्या नेत्यांना एकत्र बसवून बैठक आयोजित करण्याची योजना आखत आहे. ही बैठक यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. अलिकडच्या काळात मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर शस्त्रs जप्त करणे, हिंसाचाराच्या घटनांमध्ये घट, शांततेच्या बाबतीत प्रयत्न या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार हे पाऊल उचलण्याचा विचार करत आहे. पुढील काही महिने मणिपूरमधील परिस्थिती सामान्य झाली नाही तर केंद्र सरकार राज्यातील शांततेसाठी मैतेई आणि कुकी समुदायाच्या नेत्यांची समोरासमोर बैठक घेईल.
कुकी आणि मैतेई या दोन्ही समुदायांच्या नेत्यांनी गृह मंत्रालयात झालेल्या स्वतंत्र बैठकांमध्ये आपल्याला राज्यात शांतता हवी असून संयुक्त बैठकीसाठी तयार असल्याचे सुचित केले आहे. केंद्र सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून दोन्ही समुदायांच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या तीन फेऱ्या घेतल्या आहेत. त्यानंतर आता संयुक्त बैठकीचे नियोजन केले जात आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरीस संयुक्त बैठक घेऊ शकते. ही बैठक मणिपूरमध्ये कायमस्वरूपी शांततेसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
मणिपूरमध्ये सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. गेल्या काही दिवसात हिंसाचार कमी झाला असला तरी काही भागात अजूनही कधी-कधी तणाव निर्माण होताना दिसतो. लोकांच्या हक्कांवर कोणतीही गदा न आणता वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न शासन आणि सुरक्षा दलाकडून केला जात आहे. सुरक्षा दल राजधानी इम्फाळपासून राज्यातील सर्व डोंगराळ भागात आवश्यक साहित्य अखंडपणे पोहोचवत आहेत. तणावग्रस्त भागात अतिरिक्त सैन्य तैनात करून लोकांवर नजर ठेवली जात आहे.
3 मे 2023 रोजी ईशान्येकडील राज्य मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाला. यामध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि हजारो लोक बेघर झाले आहेत. राजधानी इम्फाळ, चुराचंदपूर आणि कांगपोक्पी जिल्हे सर्वात संवेदनशील आहेत. येथे वारंवार तणाव दिसून आला.