महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार? नवे प्रदेशाध्यक्ष काय म्हणाले?; महापौरपदाबाबतही मोठं विधान
GH News July 12, 2025 05:06 PM

येत्या ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्यातच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्रित या निवडणुका लढण्याचे संकेत मिळत असल्याने राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर, दुसरीकडे महायुतीतनेही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पण महायुती एकत्र निवडणूक लढणार की स्वबळावर याबाबतचा संभ्रम होता. हा संभ्रम भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दूर केला आहे.

भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टीव्ही9 मराठीशी एक्सक्ल्युसिव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती म्हणूनच महापालिका निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केलं. महापालिका निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या महायुती म्हणूनच लढवल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अधिवेशन संपल्यावर प्रत्येक विभागात आम्ही जाणार आहोत. कार्यकर्ते आणि जिल्ह्याच्या टीमशी संवाद साधणार आहोत. भेटीगाठी होणार आहोत. कार्यकर्ता आणि नेता एकत्र चर्चा करतील. येणाऱ्या काळात महायुतीचं चांगलं वातावरण करू. सर्व महापालिकेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढू. मुंबई ठाणे पालिकेच्याही लढू. आम्हाला वातावरण पोषक आहे. त्यामुळे एकत्र लढण्याचं ठरवलं आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं.

फडणवीस यांनी ठरवलं तर…

मुंबई महापालिकेच्या फॉर्म्युल्यावर वरिष्ठ पातळीवर त्यांची आमची कोअर टीम बसून चर्चा करतील. जागा वाटपाचं सूत्र ठरवतील. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा एकत्र बसून जागा वाटपाचं ठरवतील. या नेत्यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. तेच जागा वाटपाचं सूत्र ठरवतील, असं सांगतानाच महापौराबाबतचा निर्णय त्यावेळी होईल. देवेंद्रजींनी ठरवलं तर महापौरपद एकनाथ शिंदे गटाला देऊ शकतील. फडणवीस यांनी ठरवलं तर देऊ, असं चव्हाण म्हणाले.

पक्षाचे माझ्यावर उपकार

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली हे माझे प्रमोशन आहे. प्रत्येकाला वाटतं मी मंडलाचा अध्यक्ष व्हावा, तालुक्याचा, जिल्ह्याचा अध्यक्ष व्हावा. मी प्रदेशाध्यक्ष झालो. एवढ्या मोठ्या पदावर कार्यकर्त्याने जाणं हा माझा सन्मान आहे. उपाध्यक्ष म्हणून मी युवा मोर्चाचं काम केलं आहे. एवढ्या मोठ्या पदासाठी पार्टीने माझा विचार केला हे माझ्यावर उपकार केले असं म्हणेल. 100 टक्क्यापेक्षाही जास्त उपकार पक्षाने माझ्यावर केले आहे. एखाद्या सामान्य घरातील पदावरील कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर घेऊन जाणं हे इतर पक्षात होत नाही. बाकीच्या ठिकाणी परिवार वाद आहे, असं ते म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.