म्यानमारच्या सागाइंग भागातील एका मठावर गुरुवारी लष्कराकडून हवाई हल्ला करण्यात आला. यात कमीत कमी 23 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये 4 लहान बालकांचाही समावेश आहे. हा हल्ला लिं ता लू गावात झाला. हे ठिकाण मडाले शहरापासून 35 किंलोमीटर अंतरावर आहे, जे लष्करविरोधी कारवायांचा बालेकिल्ला मानले जाते.
समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना रात्री एक वाजता घडली, यावेळी मठात 150 पेक्षा जास्त लोक लष्करी कारवायांपासून वाचण्यासाठी लपले होते, मात्र त्याचवेळी सैन्याने हल्ला केला. ज्यामुळे मठासह आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या हल्ल्यात 4 लहान मुलांसह 23 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तसेच 30 लोक गंभीर जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लिं ता लू गावात केलेल्या या हल्ल्याबाबत म्यानमार लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र डेमोक्रॅटिक व्हॉइस ऑफ बर्मा या वृत्तसंस्थेने मृतांची संख्या 30 असल्याचे सांगितले आहे, मात्र या आकड्याची पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे मृतांचा आकडा नेमका किती आहे हे अधिकृतरित्या समोर आलेलं नाही.
समोर आलेल्या माहितीनुसार म्यानमार लष्कराने सागाईंगमध्ये लष्करी कारवाई सुरू केली आहे, त्याच दरण्यान हा हल्ला झाला आहे. लष्कराने स्थानिक बंडखोर गटांकडून हा परिसर ताब्यात घेण्यासाठी रणगाडे आणि लढाऊ विमाने तैनात केली आहेत. आगामी निवडणूकीत सत्ता राखण्यासाठी लष्कराकडून ही कारवाई करण्यात येत आहे असा आरोप एका विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याने केला आहे.
देशात लष्करी राजवट
म्यानमारमध्ये सध्या लष्कराची राजवट आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये आंग सान सू की यांच्या लोकशाही सरकारला हटवून लष्कराने सत्ता हातात घेतली होती. त्यामुळे देशात लोकशाही समर्थक आणि लष्कर समर्थक यांच्यात संघर्ष सुरु आहे. खासकरू सागाईंगमध्ये सामान्य नागरिक आणि स्थानिक मिलिशिया गटांनी लष्कराविरुद्ध युद्ध पुकारले आहे. त्यामुळे लष्कराकडून अशा गटांवर हल्ले करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून मठावर हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.