टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने इंग्लंड विरूद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये झुंजार अर्धशतक ठोकलं आहे. टीम इंडियाने ऋषभ पंत आणि केएल राहुल या दोघांच्या रुपात मोठे विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया काही प्रमाणात बॅकफुटवर गेली होती. मात्र जडेजाने नितीश कुमार रेड्डी आणि त्यानंतर ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर यांच्यासह भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. जडेजाने या दरम्यान अर्धशतकही झळकावलं. जडेजाने अर्धशतकांतर त्याच्या स्टाईलमध्ये बॅटने तलवारबाजी केली.
जो रुट याने 98 व्या ओव्हरमधील टाकलेल्या चौथ्या बॉलवर फोर ठोकत जडेजाने अर्धशतक पूर्ण केलं. जडेजाने 87 चेंडूत 57.47 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक झळकावलं. जडेजाने या दरम्यान 5 चौकार ठोकले. विशेष आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जडेजाने यासह अर्धशतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. जडेजाने याआधी बर्मिंगहॅममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी केली होती.
टीम इंडियाचा सलामीवीर आणि अनुभवी फलंदाज केएल राहुल शतक केल्यानतंर आऊट झाला. केएलने 177 बॉलमध्ये 13 फोरसह 100 धावा केल्या. केएल आऊट झाल्याने भारताचा स्कोअर 5-254 असा झाला. मात्र त्यानंतर जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी या जोडीने 1-2 धावा जोडत धावफळक हलता ठेवला. दोघेही सेट झाले होते. मात्र तेव्हाच बेन स्टोक्स याने इंग्लंडला ब्रेक थ्रू मिळवून दिला. स्टोक्सने नितीशला विकेटकीपर जेमी स्मिथच्या हाती 30 रन्सवर आऊट केलं. अशाप्रकारे स्टोक्स सहाव्या विकेटसाठी झालेली 72 धावांची भागीदारी फोडण्यात यशस्वी ठरला.
नितीशनंतर वॉशिंग्टन सुंदर मैदानात आला. त्यानंतर जडेजा आणि सुंदर जोडीने सातव्या विकेटसाठी 6 धावा जोडल्या. जडेजाने त्यानंतर चौकार ठोकत सलग तिसरं अर्धशतक पूर्ण केलं.
जडेजाकडून अर्धशतकाची हॅटट्रिक
दरम्यान जडेजाची दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात शतकाची संधी अवघ्या 11 धावांनी हुकली. जडेजाने 137 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह 89 धावांची खेळी केली. तर जडेजाने दुसऱ्या डावातही हाच तडाखा कायम ठेवत सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. जडेजाला या डावात शतक करण्याची संधी होती. मात्र परिस्थितीनुसार डाव घोषित करण्यात आला. त्यामुळे जडेजाला नाबाद परतावं लागलं. जडेजाने दुसऱ्या डावात 118 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 69 रन्स केल्या.